रत्नागिरी, दि. २९ : शहरातील ऐतिहासिक भगवती किल्ल्यावरून एका युवतीने उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण रत्नागिरी शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून, आत्महत्या केलेल्या युवतीची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेची माहिती सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास एका पर्यटकाने पोलिसांना दिली. त्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी समुद्रात युवतीचा मृतदेह आढळून आला होता. तात्काळ एनडीआरएफ, माउंटेनरिंग टीम, फायरब्रिगेड यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ही युवती सलवार-कुर्ता परिधान केलेली असून, तिचे वय अंदाजे २५ ते ३० दरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या केलेली युवती नेमकी कोण होती, ती कुठून आली, आत्महत्येचे कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पालकमंत्री सामंत यांनी युवतीची ओळख पटवून तातडीने तपास करण्याचे निर्देश पोलीस आणि प्रशासनाला दिले आहेत.
याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा तपास करत असून, शहरातील नागरिकांनी अनोळखी युवतीबाबत कोणतीही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








