रत्नागिरी, दि. १३ (प्रतिनिधी): अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. या विभागात इयत्ता ११वी व १२वी चे १०० स्वयंसेवक समाजोपयोगी उपक्रमात नियमित सहभागी होत असतात. स्वच्छता अभियान, विविध समाज जागृती रॅली, श्रमदान, वृक्षारोपण, बंधारे बांधणे, पथनाटये अशा समाजाभिमुख उपक्रमात सहभागी होऊन स्वयंसेवक स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधतात.
भारत हा शेती प्रधान देश आहे व प्रत्येक नागरिकाला शेतीचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळी भात लावणी करणे या नाविन्यपूर्ण उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे १२वी चे २५ स्वयंसेवक सहभागी झाले. रत्नागिरी शेजारी शिवरेवाडी शिरगांव या गावी श्री. किशोर लिंगायत यांच्या शेतात मुलांनी भात लावणी केली.
या शेती कामाच्या अनुभवात मुलांनी भाताची विविध वाण, पिकाचा कालावधी, रोप काढणे, बांध घालणे, पॉवर टिलर चालविणे, शेण खत घालणे, जमिन समतल करुन रोप लावणे याची माहिती घेतली. सेंद्रीय खतासोबत थोडया प्रमाणात रासायनिक खतं कस वापरायचं याच ज्ञ गान घेतलं. शेतात काम करताना पारंपारिक गाणी सुध्दा मुलांनी गायली. गावातील ग्रामस्थांनी व श्री. प्रसाद गुरव यांनी भात लावणी संदर्भात मार्गदर्शन केले. व मुलांना अल्पोपहार दिला.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. स्नेहा बाणे यांनी मेहनत घेतली. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.








