पाचल मधील हॉटेल व्यवसायिकाने लाखमोलाची पर्स ग्राहकाला केली परत

पाचल, दि. १३ (नितिश खानविलकर) : वैद्यकीय उपचार आटपून कोल्हापूरवरून रत्नागिरीला जात असताना पाचल येथे चहासाठी थांबलेल्या दिपक साळवी आणि कुटुंबियांची पर्स हॉटेल मल्हार पाचल येथे विसरली होती. मात्र ही गोष्ट कुटुंबियांना रत्नागिरी येथे पोचल्यानंतर समजली. वैद्यकीय उपचारासाठी घर बंद करून परजिल्ह्यात गेल्यामुळे दीड लाख रुपयांची रोकड आणि घरातील सर्व सोन्याचे ऐवज पर्समध्ये घेतले होते. मात्र कोणत्याही मोहाला बळी न पडता हॉटेल मल्हारचे मालक अतुल चव्हाण आणि पाचल मधील देवरुखकर कुटुंबीय यांनी पर्स मधील डॉक्टरांची फाईल बघून पर्स मालक साळवी यांना संपर्क करून त्यांची पर्स त्यांना परत सुपूर्द केली.
पर्सचा शोध लागेपर्यंत साधारण मधल्या दोन तीन तासांमध्ये साळवी कुटुंबियांची प्रचंड घालमेल झाली होती. पर्स आणि त्यातील ऐवज परत मिळेल की नाही याची धास्ती होती. साळवी कुटुंबियांना ही गोष्ट समजल्यानंतर ते पुन्हा रत्नागिरी मधून पाचल या ठिकाणी पर्सच्या शोधात निघाले असता अर्ध्या रस्त्यात असताना अतुल चव्हाण आणि देवरूखकर यांनी त्यांना संपर्क करून वस्तू त्यांच्याकडे सुखरूप असून ओळख पटवून घेऊन जाण्यासाठी सांगितले.
अतुल चव्हाण हे मूळचे पुण्याचे असून पाचल येथे तीन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करत आहेत आणि देवरुखकर यांच्या घरी त्यांचे वास्तव्य आहे. साळवी कुटूंबियांनी कलियुगातील प्रामाणिक लाकूडतोड्या असे त्यांचे वर्णन करून त्यांना बक्षीसही दिले.तसेच पाचल पंचक्रोशीमध्येही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

आणखी वाचा