पोलादपूर, दि. १६ (शैलेश पालकर) : गेल्या आठवडयामध्ये कशेडी घाटातील दरवर्षी खचणाऱ्या रस्त्यावरून एक गॅस सिंलींडरवाहक ट्रक डेंजरझोनमधून दरीमध्ये कोसळल्याच्या घटनेनंतर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातील अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आणि दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली. यादिवशी अवजड वाहनांनाही भुयारातून मार्गाक्रमण करून देण्यात आले होते. मात्र, येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांनी लेनची शिस्त पाळण्यासाठी भुयारी मार्गात चक्क रिकामी पिंपं उभी करून रस्ता दुभाजक म्हणून कामचलाऊ पध्दत अवलंबिण्यात आणल्याचे दिसून येत आहे. अशा अनेक कारणांवरून भुयारी मार्ग सतत चर्चेत राहिला आहे.
गेल्या वर्षभरापासून पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाची चर्चा सर्वच पातळीवर सातत्याने होत आहे. जे भुयार कोकणातून मुंबईकडे जाण्यासाठी आहे; त्या भुयाराचा वापर मुंबईतून कोकणाकडे जाण्यासाठी एकेरी स्वरूपात सुरू झाला होता. सर्वात आधी गणेशोत्सव काळात भुयारी मार्गातून वाहतूक सुरू करण्यात आल्यानंतर रायगड जिल्ह्यातून खेडकडे जाणाऱ्या मतदारांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भुयारी मार्ग खुला करून देण्यात आला. यानंतर प्रत्येक सणावाराला भुयारी मार्ग सुरू करून काही कालावधीनंतर बंद करण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली. भुयारातून जाणाऱ्या वाहनांवर गेल्या तीन वर्षांपासून अखंड जलाभिषेक होत असल्याने या पार्श्वभुमीवर भुगर्भ शास्त्रज्ञांकडून भुयाराच्या वरील भागातील कातळामध्ये जलाशय आहे अथवा कसे याची खात्री करून घेण्याची चर्चा झाली होती. भुयारी मार्गामध्ये वायूविजनाची सोय नसल्याने काही अंतरावर गेल्यानंतर भुयारात गुदमरण्याचा अनुभव येत असल्याचे दुचाकी स्वार आणि रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. मात्र या परिस्थितीबाबत चर्चा कमी झाली.
अलिकडेच, भुयारी मार्गातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आणि तोदेखील चर्चेचा विषय ठरला आणि कशेडी घाटातील दरवर्षी खचणाऱ्या रस्त्यावरून दि.3जुलै रोजी एक गॅस सिलींडरवाहक ट्रक डेंजरझोनमधून दरीमध्ये कोसळल्याच्या घटनेनंतर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातील अवजड वाहतूक सुरू करण्यात आली होती. कशेडी घाटातील गॅस सिलींडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला दरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर भुयारातील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. मात्र, दुहेरी वाहतूक आजतागायत सुरू असल्याने भुयारातून कोकणाकडे जाणारी आणि मुंबईकडे जाणारी वाहने समोरासमोर येऊन भुयारी मार्गामध्ये अपघात घडू नये, यासाठी रिकामी पिंपं उभी करण्यात येऊन त्यावर रिफ्लेक्टर स्टीकर्स चिकटविण्यात येऊन या पिंपांचा रस्तादुभाजक म्हणून वापर सुरू करण्यात आला आहे. भुयारी मार्गातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी तसेच वायूवीजनाच्या अभावामुळे गुदमरण्याची अवस्था टाळण्यासाठी वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण ढळून या पिंपांवर वाहने धडकून अपघात होण्याची शक्यता वाढीस लागल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
भुयारी मार्गाचे काम करणाऱ्या एसडीपीएल या ठेकेदार कंपनीकडून भुयारी मार्गात अपघात घडू नये, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने कोकणाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पुर्ण झाल्यास मुंबईकडे जाणाऱ्या भुयारीमार्गावर रस्तादुभाजकाची गरज राहणार नसल्याचा वाहनचालकांच्या चर्चेतून सूर निघत आहे.








