पोलादपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित श्रावणसरी मंगळागौरी नृत्यस्पर्धेत तांबडभुवन साईलिला ग्रुप विजेता ; सहेली व लावण्या ग्रुप ठरले उपविजेता

पोलादपूर, दि. २६ (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांच्या सातत्यपूर्ण सांस्कृतिक व पाककला आयोजनाला पोलादपूर शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असून रविवारी येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये श्रावणसरी मंगळागौरी नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील साईलिला ग्रुप विजेता ठरला तर सहेली आणि लावण्या ग्रुप उपविजेतेपदाचे मानकरी ठरले.

 

पोलादपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन मोठया दिमाखात करण्यासाठी विविध राजकीय पक्ष तसेच महिलांचे सामाजिक ग्रुप हिरिरीने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनातून नेहमीच नियोजनबध्द प्रयत्नांतून महिलावर्गाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले आहेत. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या श्रावणसरी मंगळागौरी नृत्यस्पर्धेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर, प्रदेश प्रवक्तया सायली दळवी, पोलादपूर नगरपंचायतीच्या महिला आणि बालकल्याण सभापती अस्मिता पवार, नगरसेविका शिल्पा दरेकर व स्नेहा मेहता,शिवसेना महिला तालुकाप्रमुख सुवर्णा कदम, रूपा लवंगारे, ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई बुटाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, शहरअध्यक्ष अजित खेडेकर, नितीन आरडे, नितीन म.बुटाला, कुंभळवणे सरपंच संभाजी जाधव तसेच महाड येथील परिक्षक मनिषा गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या स्पर्धेत पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील साईलिला ग्रुप विजेता ठरल्याबद्दल 10 हजार रूपये रोख व सन्मानचिन्ह तर सहेली आणि लावण्या ग्रुप यांना उपविजेतेपदाचे प्रत्येक गु्रपला 7 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक  देण्यात आले. रूक्मीणी ग्रुप या ग्रामीण भागातील दिवील गावातील महिलांनी तिसऱ्या क्रमांकाचे 5 हजार रूपये रोख तसेच दत्तकृपा ग्रुप दिवील आणि स्त्रीशक्ती महिला मंडळ यांना उत्तेजनार्थ रोख 3 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी सोलो डान्सस्पर्धेत समिक्षा दुदुस्कर प्रथम क्रमांक, संघमित्रा मोरे द्वितीय तर अंतरा पार्टे व सानिका पार्टे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.

 

पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेविका कांचनताई बुटाला यांनी ‘रेशमाच्या रेघांनी’ या गाण्यावर नृत्य करून महिलावर्गाला प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.विनय हाटे यांनी केले. पोलादपूर शहरातील महिलांनी यावेळी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून मंगळागौरीच्या नृत्यस्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला.

आणखी वाचा