मुंबईतील पृथ्वी थिएटरचा वार्षिक पृथ्वी महोत्सव २०२५ मध्ये १ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात नाटक, संगीत, कथाकथन, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि सीमांत रंगप्रयोग यांचा संगम अनुभवायला मिळाला. नाट्यप्रेमी, कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा महोत्सव केवळ रंगमंचीय सोहळा न राहता एक सांस्कृतिक संवादाचा उत्सव ठरला.
२०२५ च्या या महोत्सवात ५० हून अधिक नाट्यप्रयोग, कार्यशाळा, ओपन-एअर कार्यक्रम सादर झाले. डिजिटल स्टोरीटेलिंग, क्लासिक आणि समकालीन लिखाणाचा संगम, तसेच नवोदित दिग्दर्शक व लेखकांना स्पर्धात्मक ड्रामा आणि स्टेजडॉक इंटरॅक्टिव्ह सत्रांद्वारे संधी मिळाली. यूकेच्या नॅशनल थिएटरचे NT Live स्क्रीनिंग आणि मुंबईतील कलाकारांचा संगम यामुळे आंतरराष्ट्रीय रंगप्रवाहाशी संवाद साधला गेला. प्रायोगिक थिएटर, सूरशब्द, योग-प्रयोग यांसारख्या प्रयोगशील स्वरूपांनी महोत्सवाला बहुपर्यायी रंग दिला.
पृथ्वी: रंगभूमीचे नवे युग
आज नाट्य क्षेत्राला वेगळा आयाम देणाऱ्या पृथ्वी थिएटरची सुरुवात १९४२ मध्ये प्रथ्वीराज कपूर यांनी मुंबईत केली. त्यावेळी हे एक नाट्यमंडळ होते. या नाट्यमंडळाने सुरुवातीला फिरते नाटक (ट्रूप) स्वरूपात काम केले. कालिदासाच्या ‘शकुंतला’ या नाटकाने प्रवासाची सुरुवात झाली आणि पुढील सोळा वर्षांत ११२ शहरांत २ हजार ६०० हून अधिक प्रयोग झाले. सामाजिक-राजकीय विषय, भव्य शैली, दीपप्रकाश, वारंवार सेट बदल ही त्यांची वैशिष्ट्ये होती. १९७८ मध्ये मुंबईत स्थायी रंगमंच उभारला गेला आणि त्यानंतर आधुनिक व प्रायोगिक रंगभूमीला नवे युग मिळाले.


पृथ्वी थिएटरची प्रगती
पृथ्वी थिएटरच्या प्रवासात अनेक प्रयोगशील नाटके मैलाचे दगड ठरली. १९७८ मध्ये जी.पी. देशपांडे लिखित ‘उध्वस्त धर्मशाळा’ या नाटकाने राजकीय वास्तवाचे प्रायोगिक दर्शन घडवले. त्याच काळात आयपीटीएचे ‘बकरी’ हे नाटक धाडसी राजकीय उपरोध आणि सामाजिक प्रासंगिकतेसाठी प्रसिद्ध झाले. पुढे २०२५ मध्ये ‘ड फॉर ड्रामा’ या उपक्रमाने नव्या स्वरांसाठी खुली स्पर्धा निर्माण केली, ज्यात प्रायोगिक सादरीकरणे आणि कथाकथन शैलींचे प्रयोग झाले. या सर्व नाट्यप्रयोगांनी पृथ्वी थिएटरला प्रयोगशीलतेचा दीपस्तंभ बनवले.
पृथ्वी थिएटरने भारतीय नाट्यसंस्कृतीला नवा आयाम दिला. सामाजिक जागरूकता आणि गंभीर विषयांचे नाट्यीकरण करून त्यांनी लोकमानसाला विचारप्रवृत्त केले. दरवर्षी शेकडो प्रयोग, विविध भारतीय-विदेशी शैलींना संधी, युवा रंगकर्मी व प्रायोगिक नाट्य चळवळीस बळ आणि मंच दिला. याखेरीज, चर्चासत्रांद्वारे कलाकार-प्रेक्षक संवाद त्यांचे वैशिष्ट्य ठरले. शाळा, महाविद्यालये, नाट्यशाळांसाठी कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांनी नाट्यशिक्षणाला नवा आयाम दिला.
भारतीय नाट्यशास्त्रात रंगभूमी ही लोकमानसाचे आरसे मानली जाते. पृथ्वी थिएटरने या संकल्पनेला आधुनिक रूप दिले. रससिद्धांतानुसार करुण, हास्य, रौद्र, अद्भुत असे विविध रस जागवले गेले. नाट्यधर्म पाळत सामाजिक-राजकीय वास्तवाचे प्रतिबिंब दाखवले गेले. प्रयोगशीलता ही त्यांची नाट्यशास्त्रीय परंपरा ठरली, ज्यामुळे रंगभूमी सतत नव्या विचारांनी समृद्ध झाली.
पुढील काळात पृथ्वी थिएटर डिजिटल रंगमंच, व्हर्चुअल रिऍलिटी, हायब्रीड फॉरमॅट्स आणि क्रॉस कल्चर कॉलॅब्रेशन यांचा स्वीकार करणार आहे. नव्या साहित्यिक शैली, प्रायोगिक कथाकथन, तंत्रसंपन्न प्रेझेंटेशन यांना वाव मिळेल. जागतिक रंगप्रवाह मुंबईत दाखल होऊन भारतीय रंगभूमीला आंतरराष्ट्रीय संवादाची नवी दिशा मिळेल.
वाचकहो, पृथ्वी थिएटर ही केवळ नाट्यसंस्था नाही तर भारतीय आणि जागतिक सांस्कृतिक संप्रेषणाचा केंद्रबिंदू आहे. १९४२ पासून २०२५ पर्यंतचा हा८३ वर्षांचा प्रवास म्हणजे परंपरा, प्रयोगशीलता आणि सामाजिक-सांस्कृतिक योगदान. पृथ्वी महोत्सवाने भारतीय रंगभूमीला सतत नवे विचार, नवे प्रयोग आणि नव्या पिढीला मंच दिला आहे.
पृथ्वी थिएटर हा भारतीय रंगभूमीचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे.

– दिशा खातू
Freelance Journalist
Mumbai








