मुंबई, दि. २० : भारत निवडणूक आयोगाने देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी सोमवार, 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणारे डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सात खासदारांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 आहे. अर्जांची छाननी 6 मार्च रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 मार्च 2026 आहे. मतदान 16 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 रोजी पूर्ण होणार आहे.
कोटा किती?
विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या 286 आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पुढीलप्रमाणे ठरतो:
286 ÷ (7 + 1) = 35.75
त्यात +1 = 36.75
म्हणजे उमेदवाराला किमान 37 मते आवश्यक असतील.
पक्षीय संख्याबळ (विधानसभा)
- भाजपा : 131
- शिवसेना (शिंदे गट) : 57
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 40
- काँग्रेस : 16
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) : 10
- शिवसेना (ठाकरे गट) : 20
- समाजवादी पार्टी : 2
- जनसुराज्य शक्ती : 2
- राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी : 1
- राष्ट्रीय समाज पक्ष : 1
- एमआयएम : 1
- सीपीआय (एम) : 1
- पीडब्ल्यूपीआय : 1
- राजर्षी शाहू विकास आघाडी : 1
- अपक्ष : 2
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
महायुतीकडे (भाजपा + शिंदेसेना + अजित पवार गट + छोटे पक्ष + अपक्ष) मिळून सुमारे 234 आमदारांचे संख्याबळ आहे.
महाविकास आघाडीकडे (काँग्रेस + शरद पवार गट + ठाकरे गट + सपा + माकप) मिळून 49 आमदारांचे बळ आहे.
इतर आमदारांची संख्या 3 आहे.
किती खासदार निवडून येऊ शकतात?
- भाजप : 132 आमदार / 37 = सुमारे 3 ते 4 खासदार
- शिवसेना (शिंदे) : 58 आमदार / 37 = 1 खासदार
- राष्ट्रवादी (अजित पवार) : 40 आमदार / 37 = 1 खासदार
- महाविकास आघाडी : 49 आमदार / 37 = 1 खासदार
यावरून महायुतीचे किमान 6 खासदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीचा 1 खासदार निवडून येईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाची निवडणूक
महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागांसाठी होणारी ही राज्यसभा निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतरचे संख्याबळ प्रथमच राज्यसभा निवडणुकीत प्रत्यक्ष परीक्षेला लागणार आहे. विशेषतः शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी यांसारख्या नेत्यांच्या जागांवर कोणते उमेदवार उतरतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील ताकद दाखवणारी ठरणार असून, केंद्रातील राजकारणात महाराष्ट्राचा आवाज किती मजबूत राहील, हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.
photo- tv9marathi







