जिल्ह्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सकाळी १० वाजता ईव्हीएम उघडणार

रत्नागिरी, दि. ०८ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६९३ मतदान केंद्रांवर शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अत्यंत चुरशीने व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५६ व पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी रिंगणात असलेल्या ४७२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या (दि. ९ फेब्रुवारी) ठरणार असून सकाळी १० वाजल्यापासून तालुकानिहाय शासकीय गोदामांमध्ये ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे.

या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदारांपैकी ६ लाख ५४ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सरासरी ५५.७९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये ३ लाख १८ हजार ६६२ पुरुष, ३ लाख ३६ हजार २८५ महिला आणि इतर दोन मतदारांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

तालुकानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार चिपळूण तालुक्यात सर्वाधिक ६२.५६ टक्के मतदान झाले आहे. येथे ५७ हजार ९८२ पुरुष व ५६ हजार ९१५ महिला अशा एकूण १ लाख १४ हजार ८९७ मतदारांनी मतदान केले. रत्नागिरी तालुक्यात ५८.५२ टक्के मतदान झाले असून येथे ५९ हजार ६४ पुरुष, ६० हजार ६१४ महिला व इतर दोन मतदारांनी आपला हक्क बजावला. खेड तालुक्यात ५६.८९ टक्के, गुहागर तालुक्यात ५६.५२ टक्के, दापोली तालुक्यात ५३.८७ टक्के, संगमेश्वर तालुक्यात ५३.८५ टक्के, लांजा तालुक्यात ५१.१६ टक्के व राजापूर तालुक्यात ४९.८७ टक्के मतदान झाले. मंडणगड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४८.७९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अटीतटीची लढत झाली आहे. काही ठिकाणी सरळ द्वंद्व लढती झाल्या, तर काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढतींचे चित्र होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात घरोघरी संपर्क साधत तसेच कॉर्नर सभा घेऊन उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

सर्व ईव्हीएम मशीन संबंधित तालुक्यांच्या स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूम परिसरात सीसीटीव्ही देखरेख तसेच २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उद्या सकाळी १० वाजल्यापासून प्रथम टपाली मतांची मोजणी केली जाणार असून त्यानंतर ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

तालुकानिहाय फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून मंडणगड तालुक्यात सुमारे १ तास ४० मिनिटांत पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गुहागर व राजापूर तालुक्यांत सुमारे तीन तासांत निकाल स्पष्ट होईल. चिपळूणमध्ये सुमारे ५ तास २० मिनिटांत, लांजामध्ये सुमारे ५ तासांत निकाल हाती येईल. रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली व खेड तालुक्यांत ६ ते ६ तास ४० मिनिटांत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दापोली तालुक्यात मतमोजणी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात होणार आहे. तेथे सुरुवातीला चार टेबलांवर तीन फेऱ्यांत टपाली मतांची मोजणी होणार असून त्यानंतर १४ टेबलांवर १४ फेऱ्यांत ईव्हीएमद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दोन पोलीस निरीक्षक, सहा अधिकारी, १६० पोलीस अंमलदार व ३६ होमगार्ड असा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दापोली तालुक्यातील एकूण १ लाख ४० हजार ५५८ मतदारांपैकी ७५ हजार ७१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये ३५ हजार ६४५ पुरुष व ४० हजार ०७२ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण ५३.८६ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी व निकालानंतर नागरिकांनी संयम राखावा तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

एकंदरीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे उद्या पूर्णतः स्पष्ट होणार असून शिवसेना (शिंदे गट) आपला गड सुरक्षित ठेवणार की महाविकास आघाडी जिल्ह्यात सत्ता परिवर्तन घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचा नवा कारभारी कोण ठरणार, हे ईव्हीएम मशीन उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा