सर्वोदय छात्रालयात विचारांची पिढी घडवली जातेय- डॉ. राहुल मराठे

रत्नागिरी, दि. २६ (प्रतिनिधी): यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयात प्रत्येक छात्र संस्कारित होत आहे, एका विचारांची पिढी घडवली जात आहे. या विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर कोणताही खोटेपणाचा मुखवटा नाही, प्रामाणिकपणाचा भाव आहे. या ट्रस्टचे संस्थापक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांची जयंती कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो, हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन डॉ. राहुल मराठे यांनी केले.

श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट येथे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री व ट्रस्टचे संस्थापक कै. बाळासाहेब खेर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित कृतज्ञता दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते, विद्यमान अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, श्रीराम तथा भाई वंजारे व व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके होते.

याप्रसंगी डॉ. मराठे म्हणाले की, कृतज्ञता दिन म्हणजे यात सेवेचा भाव येतो व दुसरा समर्पण, त्यागाचा. खेर यांच्या चरित्राचा अभ्यास आज करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांनी आधी केले, मग सांगितले. अलीकडे राजकारणात फक्त आधी सांगितले, मग सांगितले, नंतर सांगितले असेच दिसते, कृती दिसत नाही. मी बाळासाहेब खेर यांचे अनुवादित चरित्र वाचले तेव्हा त्यांची दैनंदिनी आवडली. दिवसभरातील घटनांमध्ये सुख जास्त व झालेल्या दुःखाकडे दुर्लक्ष करायचे हे त्यांच्या चरित्रातून समजले. यामुळे सकारात्मक वाढीस लागते. आजच्या पिढीला याचीच गरज आहे. कारण त्यांना नाही हा शब्द ऐकण्याची सवय नाही. मग घरातही काही अप्रिय घटना घडतात, हे आपण वाचतो. बाळासाहेब खेर यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव सुद्धा होता. त्यावेळी टिळकांना तुरुंगवास झाला तो दिवस बुधवार होता. त्यामुळ खेर हे कायम बुधवारी उपवास करायचे. मुंबईच्या चमडेवाली वस्तीमध्ये स्वतः खेर यांनी लक्ष घातले व त्या सर्व रहिवाशांना सुविधा दिल्या. त्यानंतर या वस्तीचे नाव खेरवाडी झाले.

हरिश्चंद्र गीते यांनी ट्रस्टच्या कामकाजाचा आढावा घेऊन सर्वोदय छात्रालयाची स्थापना, बाळासाहेब खेर यांच्या जीवनातील उद्बोधक प्रसंग सांगितले. प्रास्ताविकामध्ये अॅड. ढवळ यांनी ट्रस्टचे उपक्रम, खेर यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींविषयी माहिती दिली. ट्रस्टी पांडुरंग पेठे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. व्यवस्था समिती उपाध्यक्ष प्रा. जयश्री बर्वे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कल्पेश जाधव याने सूत्रसंचालन केले. गजानन चाळके यांनी आभार मानले.

आदर्श छात्र पुरस्कार

बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार मयुर सुर्वे याला स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रू. २००१ देऊन गौरवण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ म्हणून अनिश नाटेकर, करण गोपाळ या विद्यार्थ्यांना दिला. तसेच तात्या-ताई शिष्यवृत्ती आदित्य शिवगण याला, कै. पद्मजा व कै. विष्णू बर्वे शिष्यवृत्ती दिगंबर रहाटे याला, कै. राजाराम पांगम शिष्यवृत्ती विशाल लटके याला आणि कै. सौ. हेमलता गीते शिष्यवृत्ती विभागून समीर कनावजे व आदित्य सिनकर यांना देण्यात आली. पुरस्कारप्राप्त विद्यार्थी मयुर व अन्य विद्यार्थ्यांनी छात्रालय व पदाधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आणखी वाचा