रत्नागिरी, दि. १० (प्रतिनिधी): पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंद यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्याने वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात होणार आहेत. स्वामी स्वरूपानंद यांनी रचिलेल्या अभंगांवर ही व्याख्यानमाला होईल.
व्याख्यानमालेत मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी अभ्यासिका सौ. अंजली बर्वे यांचे रामनाम येता कानी होय पातकांची धुनी या विषयावर व्याख्यान होणार आहे. 14 ऑगस्ट रोजी शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणु दांडेकर यांचे भक्त तो प्रेमळ अर्पितो प्रेमळ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी प्रवचनकार प्रणव गोखले यांचे स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय या विषयावर व्याख्यान होणार आहे.
प्रत्येक व्याख्यानाआधी स्वामी स्वरूपानंद यांनी रचिलेल्या व संगीतकार विजय रानडे यांनी संगीतबध्द केलेल्या अभंगाचे सादरीकरण होईल. त्यानंतर त्या अभंगावर प्रवचन होईल. अध्यात्म मंदिरात दररोज सायंकाळी 5. 30 ते 7.30 या वेळेत ही व्याख्याने होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने यांनी केले आहे.








