रत्नागिरी, दि. ०९ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत रत्नागिरी तालुका आणि जिल्ह्यात शिवसेना–भाजप महायुतीने एकतर्फी विजय मिळवत राजकीय इतिहास घडवला आहे. तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट व २० पंचायत समिती गणांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत यश संपादन केले. मतमोजणी पूर्ण होताच निकाल स्पष्ट झाले आणि शिवसेनेच्या विजयाच्या घोषणेसोबतच मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोषाला उधाण आले.
गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि “शिवसेना जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विजयी उमेदवार बाहेर पडताच कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या विजयामुळे रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांत शिवसेनेचे ३०० पैकी जवळपास १७० उमेदवार विजयी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५६ पैकी ४१ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. “मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा विजय शिवसैनिकांची भेट आहे,” असे सामंत म्हणाले.
जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यातील दहा पैकी दहा जिल्हा परिषद जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. दापोलीत सहापैकी सहा, खेडमध्ये सहा पैकी सहा जागा शिवसेनेच्या पारड्यात पडल्या असून एक जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला मिळाली आहे. संगमेश्वरमध्ये शिवसेनेला दोन, भाजपला एक, राष्ट्रवादीला एक तर उबाठा गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. राजापूरमध्ये सहापैकी सहा तर लांजामध्ये चारपैकी चार जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत.
जिल्हा परिषद गटांच्या ५६ जागांपैकी शिवसेना – ४१, भाजप – ४, राष्ट्रवादी – ५, उबाठा – ५ आणि मनसे – १ अशी अंतिम आकडेवारी आहे. पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी शिवसेनेने ७३, भाजपने १४, राष्ट्रवादीने १३, उबाठाने ११ तर इतरांनी १ जागा मिळवली आहे.
या निकालामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच पंचायत समित्यांवर शिवसेनेचे सभापती विराजमान होतील, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून शिवसेनेच्या संघटनशक्तीचा आणि जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात शिवसेना–भाजप महायुती अधिक बळकट होणार असल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे.







