साखरपा, (संगमेश्वर) दि. २३ (संतोष पोटफोडे): संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेतील रस्ता खड्डेमय झाला असून वाहनधारक व पादचारी यांच्यासाठी अतिशय त्रासदायक बनला आहे. काही वेळेला पादचाऱ्यांची चिखलमिश्रित पाणी उडून एकप्रकारे रंगपंचमीच होते. पादचारी व वाहन चालकांमध्ये खड्ड्याची दहशत निर्माण झाली आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था होत असून काँक्रिटच्या रस्त्याशिवाय पर्याय नाही. खड्ड्यातून गाडीचालविणे म्हणजे एक प्रकारे साहसी खेळच म्हणावा लागेल.
गिरजा मंदिर ते साखरपा भंडारवाडी पर्यंतचा रस्ता अतिशय खड्डेमय बनला आहे. दररोज या मार्गांवरून अनेक गाड्या धावत असून रत्नागिरी कोल्हापूर मार्गांवरील व्यापारी दृष्ट्या कोंडगाव बाजारपेठ महत्वाचे ठिकाण असल्याने या रस्त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.








