संगमेश्वर, दि. १७ (प्रतिनिधी) – मुंबई-गोवा महामार्गावर ओझरखोल (ता. संगमेश्वर) येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एस.टी. बस आणि खासगी मिनी बस यांच्यात भीषण अपघात झाला. दोन्ही बस समोरासमोर धडकल्या आणि अपघात इतका जबरदस्त होता की मिनी बसचा समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत एकूण १९ प्रवासी जखमी झाले असून, मिनी बसचा चालक गंभीर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकून पडला होता.
अपघात घडताच ग्रामस्थ, संगमेश्वर पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने अर्धा ते एक तास शर्थीचे प्रयत्न करून अडकलेला चालक सुखरूप बाहेर काढण्यात आला. सर्व जखमींना प्रथम संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींवर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघातामागे ठेकेदाराची निष्काळजी?
प्रत्यक्षदर्शींनुसार, महामार्गावर योग्य ते डायव्हर्जन न दिल्याने हा अपघात झाला. अपघात घडल्यानंतर ठेकेदार कंपनीने संबंधित ठिकाणी काम सुरू केले असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. सततच्या अपघातांमुळे महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जखमींची यादी अशी –
-
विजय प्रसादे (६०, रामपेठ, संगमेश्वर)
-
अजय भालेराव (४०, एस.टी. चालक, मूळ जळगाव)
-
रघुनाथ फाटक (३४, कसबा, संगमेश्वर)
-
अमृता साठे (५२, चिपळूण)
-
आहरत सावंत (१५, पाली)
-
अण्णा पवार (३३, पाली, रत्नागिरी)
-
सुशील मोहिते (३५, वांद्री, संगमेश्वर)
-
सविता मोहिते (६५, वांद्री, संगमेश्वर)
-
सहारा फकीर (२२, शेट्येनगर, रत्नागिरी)
-
केतन पवार (३४, कुवारबाव, रत्नागिरी)
-
शेखर साठे (३२, डिप्लोमा फायरमन, रत्नागिरी)
-
सिद्धार्थ सावंत (७४, पाली, रत्नागिरी)
-
अनिरुद्ध धनावडे (५३, मारुती मंदिर, रत्नागिरी)
-
अंकिता जोगळे (४०, माखजन, संगमेश्वर)
-
वैशाली सावंत (६०, पाली, वळके)
-
उमर आफ्रिन मुलानी (२५, कसबा, संगमेश्वर)









