संगमेश्वर-देवरुख राज्य मार्गावर बुरंबी येथे रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य

देवरुख, दि. १० (प्रतिनिधी):   संगमेश्वर देवरुख राज्यमार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या वरील थर उखडल्याने बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. याबरोबरच लोवले, बुरंबी या ठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. याकडे त्वरित संबंधितांनी लक्षणा दिल्यास एखाद्याला जीव गमवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संगमेश्वर देवरुख मार्गावर बुरंबी या ठिकाणी खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी काही दुचाकी देखील घसरून प्रवासी जखमी झाले आहेत. या खड्ड्यांची खोली पाहता अपघाताला आमंत्रणच मिळत आहे. गेल्या मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी गटार नसल्याने मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते याचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाकडून एका बाजूचे गटार खोदून पाण्याचा निचरा करण्यात आला मात्र त्यानंतर या ठिकाणी खड्ड्यांची खोली वाढत गेली आहे याबरोबरच या मार्गावर खड्ड्यांच्या बाजूला बारीक खडीचे ढीग उभे राहिले आहेत. त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने आवाज उठवून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तसेच वाहन चालकांमधून तीव्र नाराजी पसरली आहे. याबरोबरच लोवले या ठिकाणी देखील मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे जीव घेणेच ठरत आहेत.
संगमेश्वर-साखरपा या राज्यमार्गाच्या ३२ किलोमीटरचे डांबरीकरणाचे (नूतनीकरणाचे) काम झाल्यास सुमारे तीन वर्ष झाली असून मार्गावरचा थर अनेक ठिकाणी उखडला गेल्याने बारीक खडी सद्या रस्त्यावर पसरली आहे. या पूर्वी देखील अनेक ठिकाणी अशाच प्रकारे बारीक खडी मार्गावर येऊन रस्त्याची वाताहात झाल्या मुळे गाव विकास समितीने याबाबत उपोषण देखील केले होते यानंतर मे महिन्यापूर्वी या मार्गावर एक थर टाकण्यात येईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या गाव विकास समितीला देण्यात आले होते. मात्र जून महिन्यात पाऊस सुरू होता होता काही ठिकाणी किरकोळ डांबराचा थर टाकण्यात आला. त्यावेळी देखील अनेक वाहन चालकांसह तालुक्यातील स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.
आता तर ही परिस्थिती खूपच बिकट झाली असून संबंधित विभागाने तसेच ठेकेदाराने त्वरित लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत अशी मागणी बुरंबी, लोवले गावातील ग्रामस्थांसह वाहन चालकातून होत आहे.

आणखी वाचा