विकासासाठी गरज लागेल तिथे सहकार्य करू : प्रशांत यादव

मुरडव (ता. संगमेश्वर), दि. ३० : ग्रामपंचायतीचे रुपडे बदलले, तसे गावाचे रुपडेही बदलण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. गावाच्या विकासासाठी गरज लागेल तिथे सहकार्य करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी शुक्रवारी (ता. 30) मुरडव येथे दिले.
निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत मुरडवच्या नूतन इमारतीचे फीत कापून प्रशांत यादव यांच्या हस्ते शुक्रवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. तसेच शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत मान्यवरांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच महिलांनी मान्यवरांचे औक्षण केले. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना प्रशांत यादव यांनी ग्रामस्थांना विकासाबाबतीत आश्वस्त केले. ते म्हणाले, ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्यासाठी पाणीपट्टी इतर करांची वसुली वेळेत होणे गरजेचे आहे. आपणच आपल्या गावचा विकास करू शकतो. त्यासाठी गावातल्या प्रत्येकाने ठाम निर्धार केला आणि ग्रामपंचायतीला सहकार्य केले, तर विकास दूर राहत नाही. विकासाचे काम पुढे नेत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात, अडचणी येतात. पण, त्यावर संघटीतपणे मात करण्याची तयारी असली पाहिजे. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला संधी मिळते. सधी मिळाली की यशाचा टप्पा गाठणे सोपे जाते. मी सुद्धा व्यावसायिक आहे. पण, राजकारणात चांगली संधी मिळाली. पराजयाचा सामना करावा लागला असला, तरी मनात खंत नाही. कारण आपण सुज्ञ मतदारांनी मला विधानसभा निवडणुकीत भरभरून प्रेम दिले आहे. हीच माझ्या यशाची शिदोरी आहे, असे मी मानतो. चांगली माणसे जोडता आली, यातच मी समाधानी आहे. त्यामुळे यापुढेही काम करत राहू. तुमच्या सर्वांची साथ कायम राहिली, तर भविष्य निश्चितच उज्जवल असेल, असा विश्वासही यावेळी प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक संतोष थेराडे आणि संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप सावंत यांचीही भाषणे झाली. यावेळी प्रशांत यादव यांच्या हस्ते मुरडवचे सरपंच नितीन मेणे, ग्रामपंचायतीला बक्षिसपत्राने जागा देणारे सचिन अधटराव आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुरडवचे उपसरपंच अमित पवार, परचुरीच्या सरपंच शर्वरी वेल्हे, ठेकेदार प्रणय भोसले, पिरंदवणेचे सरपंच विश्वास घेवडे, गावकर पांडुरंग मेणे, मानकरी सुरेश अधटराव, मानकरी दिलीप जाधव, मानकरी आत्माराम बाटे, मानकरी चंद्रकांत गांगरकर, विजयराव जाधव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार कदम, कुणबी प्रसारकचे दत्ताराम लांबे, ओम फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीशजी सुर्वे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विजय शिगवण, कोंडीवरेच्या सरपंच सायली केंबळे, पोलिस पाटील राजेंद्र मेणे, शिवणेचे पोलिस पाटील मनोज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आणखी वाचा