पोलादपूर, दि. ०२ (शैलेश पालकर) : गद्दार मिंध्यांना त्यांच्या बापाच्या नावावर एकही मत मिळणार नाही हे माहिती असल्यानेच त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार असे उल्लेख सुरूवातीपासूनच केले. यांनी माझा बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरले, पण हा समोर असलेला शिवसैनिक माताभगिनींचा जनसमुदाय चोरता आला नाही. मी पुन्हा सांगतो शिवसेना मला वारशात मिळाली आहे आणि शिवसैनिक मला माझ्या वडीलांपासून मिळाले आहेत. आता कोणी भगवा नाचवितो तर कोणी नॅपकीन.. इथल्या व्यावसायिकांना तो त्रास देत आहे असे समजले आहे. पुन्हा सत्ता तर येऊ दे, याचा नॅपकीनच पिळून काढतो, असा सज्जड दम शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोलादपूर येथे आपल्या जनसंवाद मेळाव्यादरम्यान दिला. स्थानिक आमदारांचा नामोल्लेख टाळत उध्दव ठाकरे यांनी हे विधान केल्यानंतर उपस्थितांमध्ये ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी गगनभेदी घोषणाबाजी सुरू झाली.
पोलादपूर शहरातील भैरवनाथनगर सहाणेवरील मंडपामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंवाद मेळाव्याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार नेते अनंत गीते, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, शहरप्रमुख निलेश सुतार, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, विनोद पालकर,अमरदीप नगरकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर नेते अनंत गीते, आ.सुभाष देसाई, आ.भास्कर जाधव, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, विधानसभा गटनेते आ.अजय चौधरी, विनोद घोसाळकर, बाळ राऊळ, विक्रांत जाधव, सुरेंद्र चव्हाण, चेतन पोटफोडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी, पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्यासमोर संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान मोरारजी देसाईंनी चळवळीतील आंदोलकांना गोळया घातल्याची चौकशी करण्याची मागणी रायगडचे सुपुत्र सी.डी.देशमुख यांनी करीत राजिनामा भिरकावून स्वाभिमान दर्शविला होता. आता महाराष्ट्र ओरबाडला जात असतानाही मिंधे सत्तेला चिकटून बसले आहेत आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा करीत असल्याची टीका करून रायगडाच्या वारं फिरल्याची चर्चा सुरू झाली आहे. रायगडचं वारं फिरलं म्हणजे दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसले आहेत, मोठमोठी सरकारं उलथवून टाकली आहेत. पोलादपूर ही संतांची आणि वीरांची भुमी असल्याचा उल्लेख होत असताना या ठिकाणी वारकऱ्यांचा आणि मावळयांचा भगवा फडकविणे तर सोडाच; नॅपकीन फडकविणारे फिरत आहेत. तानाजी मालुसरे यांची भुमी असून जीव गेला तरी बेहत्तर भगवा फडकविणार म्हणजे फडकविणारच,ही निष्ठा आहे. मात्र, स्वप्नातील पालकमंत्र्यांनी किती जॅकीट कोट शिवले;किती नॅपकीन घामाने भिजून गेली, पण मंत्रीपद काही मिळालेच नाही, ही गद्दारांची भुमी नाही. रायगड किल्ल्यावर गद्दारांना टकमक टोक दाखविण्याची सोय आहे, असे यावेळी उपरोधिकपणे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप आणि तपासयंत्रणांवर टीका करताना उध्दव ठाकरे यांनी,महाराष्ट्राच्या शिखर बॅक घोटाळयाचा उल्लेख केल्यानंतर भाजपाने मोदी गॅरन्टी दाखवून सर्वांना क्लिनचीट दिले आहे. भ्रष्टाचार करा, मोठा भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या आणि कुछ नही होगा, ये मोदी गॅरन्टी है, जे तुमच्याकडे धाड घालायला आले तेच तुमच्याकडे झाडू मारायला येतील, ये मोदी गॅरन्टी है, अशी खिल्ली उडविली. मोदी यांच्या मागील दोनवेळेच्या प्रचारामध्ये आपण त्यांच्यासोबत होतोच, आता मोदी गॅरन्टी करीत फिरत आहेत. ज्यांच्यावर आरोप केले होते, त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरू असलेल्या कारवाईचे काय झाले. जेवढे भ्रष्ट तेवढे मोदींनी स्वत:कडे घेतले. वारकरी सांप्रदाय या उल्लेखावरून शिवसेनाप्रमुखांचे जुनं वाक्य आठवले की अाम्ही अन्यायावर ‘वार’ करणारे वारकरी आहोत, जो आपला भगवा आहे. त्यामध्ये छेद करणाऱ्यां गोमुत्रधारी हिंदुत्वाला आता जागा दाखवून द्यायची गरज आहे.असे मत यावेळी उध्दव ठाकरे यांनी मांडले.
मोदींनी 2014 साली दिलेल्या योजना आतापर्यंत किती पूर्ण झाल्या, कितींचा लाभ झाला, याबाबत आता जनतेने उघडपणे बोलण्याची गरज आहे. महिलांना मोदींच्या उज्ज्वला योजनेचा लाभ किती झाला आणि शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना मिळालेल्या कर्जमाफीचा लाभ किती झाला, याची उघडपणे चर्चा करा. अवकाळीची मदत तोत्तेफ् वादळात मदत आली होती की नव्हती. एपिडेमिक ऍक्ट ब्रिटीशांनी आणला रोगराईसंदर्भातील खर्चाबाबत अधिक सविस्तर चौकशी होत नाही पण कोविडच्या संदर्भात मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी करू नका तर पीएमकेअरमध्ये जमा झालेल्या निधीची चर्चा करा, असे आव्हान यावेळी दिले.
प्रारंभी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी पोलादपूर येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन भरगच्च स्वरूपात झाल्याबद्दल ॠण व्यक्त करताना आपल्या भाषणामध्ये प्रत्येक शिवसैनिकाशी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संवाद साधणार आहेत. आपल्या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने निर्माण करणारी लोकशाही अस्तित्वात आहे आणि ही लोकशाही टिकविण्यासाठीचे नेतृत्व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे करीत असल्याचे सांगितले. जनता लोकशाहीमध्ये सर्वात मोठी असून संविधानात्मक हक्कांची पायमल्ली करीत लोकशाही राज्य संकटात आणणाऱ्या प्रवृत्तीविरोधात सर्वांना एकवटण्याची जबाबदारी स्विकारली आहे, असे सांगितले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले. छ.शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा, शाहू फुले आंबेडकर यांच्यासह माजी आमदार स्व.माणिक जगताप व माजी मंत्री स्व.प्रभाकर मोरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून पुन्हा जनसंवाद मेळाव्याला सुरूवात झाली. यानंतर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी भाषण पूर्ण करताना राज्याच्या राजकारणातील गद्दारी मोडून काढण्याची आवश्यकता व्यक्त करून शिवसेना पुन्हा आपल्या मुळ रूपात येईपर्यंत उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्ही सारे वचनबध्द असल्याचे सांगितले.
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा ठाम विश्वास
लोकसभेची निवडणूक दोन तीन लाखांनी जिंकणार
माजी मंत्री शिवसेना नेते अनंत गीते यांनी, नरवीरांच्या पुण्यभुमीप्रमाणेच पोलादपूर तालुका वारकरी सांप्रदायाचा समजला जातो. वारकरी सांप्रदायामध्ये मोरे माऊली, आजरेकर महाराज फड, ढवळेबाबा वारकरी सांप्रदाय, भावे महाराज वारकरी सांप्रदाय, फणसे बाबांचा सांप्रदाय, लक्ष्मण मालुसरे फड, हनुमंतबाबांचा वारकरी सांप्रदाय, गणेशनाथ महाराज सांप्रदाय, अशा या वारकरी सांप्रदायांनी भगवी पताका कायम फडकवित ठेवली आहे. शिवरायांच्या वीरश्रीने आणि संतांच्या विभूतीने नटलेल्या या पोलादपूर तालुक्यात संवाद साधला जात आहे. यामुळे मुंबईमध्ये जसे वारकरी भवन आपण उभारले आहे तसेच पोलादपूर तालुक्यातील वारकऱ्यांकरीता वारकरी भवन उभारण्याचा मनोदय व्यक्त करीत असल्याचे यावेळी सांगितले. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे होणार असल्याचे शपथपूर्वक सांगितले. लोकसभेची काळजी आपण करीत नसून लोकसभेची निवडणूक आपण दोन-तीन लाखांनी आपण जिंकलोच, असा आत्मविश्वास यावेळी माजी मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. ज्यादिवशी स्नेहलचा प्रवेश महाडला घेतला; स्नेहल जगताप पुढच्या विधानसभा निवडणुकीत महाडच्या आमदार असतील, असा शब्द नेते अनंत गीते यांनी उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला.
यावेळी महाडच्या विधानसभा आमदारांच्या पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे, वरंधचे शाखाप्रमुख विकास धनावडे यांनी शिवबंधन बांधून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
जनसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी राजिमस बँकेचे संचालक हनुमंत जगताप, माजी सभापती दिलीप भागवत, दिनेश पाटील, ऍड.गायकवाड, दिविलचे उपसरपंच प्रमोद मोरे, पद्माकर मोरे, तालुका महिला संघटिका माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, शहर संघटीका वैशाली चिकणे, माजी सभापती दिलीप भागवत, नगरसेविका श्रावणी शहा, सान्वी गायकवाड, तेजश्री गरूड, धामणदिवी सरपंच क्षमता बांद्रे, कोतवालचे माजी सरपंच महेश दरेकर, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, कापडे बुद्रुकचे माजी सरपंच अजय सलागरे, अमोल भुवड तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी तालुका संघटक अजय सलागरे यांनी आभार प्रदर्शन केले.