खेड, दि. १३ (प्रतिनिधी) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी.ए. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडची माजी विद्यार्थिनी कु. श्रुती प्रशांत नाईक हिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सी. ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला.
रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी कु. श्रुती नाईक हिने इयत्ता सन 2018-19 मध्ये 12वी पर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले. तसेच इ. 12वी वाणिज्य शाखेच्या पहिल्याच बॅचमध्ये तिने शाळेत व्दितीय क्रमांक देखील पटकावला होता. रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच तिची सी.ए. या अभ्यासक्रमाची तयारी सुरू झाली होती. यासाठी तिला रोटरी स्कूलमधील वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. याचबरोबर फेब्रुवारी 2019 मध्ये ’ काॅमर्स विझार्ड टॅलेंट सर्च ’ परीक्षेत यश संपादन करून देशपातळीवरील गुणवत्ता यादीत झळकली.
कु. श्रुती नाईक हिचे संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








