मुंबई, दि. १६ : ग्राहकांना अचूक वीजबिलासह आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे तब्बल ८७.५७ लाख स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामध्ये **महावितरण**ची ८५.८५ लाख स्मार्ट मीटर बसविण्याची प्रमुख भूमिका आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा परिवर्तनाची व्यापक मोहीम राबविण्यात येत असून सौर कृषी पंप, वीज वितरण सुधारणा व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. स्मार्ट मीटर बसविण्यात मिळवलेले हे यश राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक बदलांचे फलित असल्याचे मानले जात आहे.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना शंभर टक्के अचूक वीजबिल मिळत असून दर तासाला मोबाईल ॲपवर आपल्या वीजवापराची माहिती पाहता येते. यामुळे ग्राहकांना वीज वापराचे योग्य नियोजन करता येते तसेच अनावश्यक खर्च टाळण्याची संधी मिळते. स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वेळेत वीज वापरावर प्रति युनिट ८० पैसे ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) सवलत देण्यात येत आहे. औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वापरल्या जाणाऱ्या विजेवर सवलत दिली जात आहे.
राज्यात ९ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत असून नागरिकांमध्ये स्मार्ट मीटरविषयी माहिती आणि विश्वास निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.
दि. १० फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र ८७.५७ लाख स्मार्ट मीटरसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. बिहारमध्ये ८६.४४ लाख तर उत्तर प्रदेशात ८२.७५ लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या टीओडी सवलतीचा थेट आर्थिक लाभ ग्राहकांना होत आहे. जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ५४ लाख ४२ हजार घरगुती ग्राहकांना तब्बल ५१ कोटी ४२ लाख रुपये सवलतीचा लाभ झाला आहे. याशिवाय लघुदाब औद्योगिक ग्राहकांना १०६ कोटी ८९ लाख रुपये, वाणिज्यिक ग्राहकांना ४३ कोटी रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी ७ कोटी ३० लाख रुपये आणि अन्य ग्राहकांना ६ कोटी ७० लाख रुपये इतका लाभ मिळाला आहे. या सर्वांचा एकत्रित लाभ २१५ कोटी ३५ लाख रुपये इतका आहे. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना याच कालावधीत दिवसाच्या वीज वापरावर १३४९ कोटी रुपये टीओडी लाभ मिळाला असून त्यात औद्योगिक ग्राहकांचा वाटा ११०५ कोटी रुपये इतका आहे.
राज्यात सर्व ३०,१६४ विद्युत फीडरवर तसेच २.८० लाख वितरण ट्रान्सफॉर्मरवर स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वीज वितरण प्रणालीतील नेमका वापर समजणे, वीजगळती रोखणे, ऊर्जा लेखापरीक्षण करणे आणि वीज पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी करणे शक्य झाले आहे. विजेच्या मागणीचा पॅटर्न अचूकपणे ओळखून त्यानुसार भविष्यातील पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी ही आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते हा गैरसमजही दूर झाला आहे. उलट बिलिंगविषयक तक्रारी राज्यात अर्धा टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. स्मार्ट मीटरमुळे स्वयंचलित पद्धतीने वीज वापराचे रीडिंग नोंदविले जात असल्याने मानवी चुका टळत असून ग्राहकांना अचूक व पारदर्शक बिल मिळत आहे.
महावितरणतर्फे ग्राहकांना मोबाईल ॲप डाऊनलोड करून नियमितपणे आपल्या वीजवापराची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात वेळेनुसार वीज वापरावर आधारित अधिक सवलती व सुविधा स्मार्ट मीटरद्वारे उपलब्ध होणार असून, हा उपक्रम राज्यातील ऊर्जा व्यवस्थापनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.







