रत्नागिरी, दि. १८ (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धनसाठी एस आर दळवी (I) फाऊंडेशनद्वारे मे महिन्यात बेलापूर येथे बीजगोळे अर्थात सीडबॉल तयार कारण्याचा एक उपक्रम राबविण्यात आला होता. दळवी फाऊंडेशन चे संस्थापक श्री.रामचंद्र दळवी व श्रीमती.सीता दळवी हे दोघेही पर्यावरणप्रेमी असून पर्यावरण संवर्धनासाठी ते नेहमीच कार्यरत असतात.
राज्यातील अनेक भाग असे आहेत, ज्या ठिकाणी जागा तर आहे मात्र प्रत्यक्ष जाऊन वृक्षारोपण करता येत नाही आणि अश्या भागात पोहचण्यासाठी “मुंबई पुणे ऍडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुप” यांच्या सहाय्याने या सीड्स बॉल्सचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. या ट्रेकिंग ग्रुपद्वारे वर्षभर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ट्रेकिंग्स तसेच विविध सहलींचे आयोजन केले जाते.
एस आर दळवी (I) फाऊंडेशन आणि मुंबई पुणे ऍडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेकिंग साठी गेलेल्या ट्रेकर्सनी दिनांक १६ जुलै २०२४ पंढरपूर जवळील वेळापूर येथे सदर सीडबॉल्स थ्रो करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध प्रकारची वृक्षवल्ली नक्कीच बहरताना दिसून येईल.








