अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची पदोन्नतीने बदली; संभाजीनगर येथे गुप्तवार्ता विभागात उपआयुक्तपदी नेमणूक

रत्नागिरी, दि. २७ : रत्नागिरी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जयश्री गायकवाड यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त या पदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी बाबुराव महामुनी रत्नागिरी जिल्ह्याचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत.
जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे अडीच वर्षे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. याआधी देखील त्या विविध पदांवर एकूण १० ते १२ वर्षे या जिल्ह्यात कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था आणि विशेषतः बारसू प्रकल्पासारख्या संवेदनशील विषयांमध्ये त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व दक्ष भूमिका बजावली.
अभ्यासू, संवेदनशील आणि लोकाभिमुख अधिकारी अशी त्यांची ओळख जिल्ह्यात निर्माण झाली होती. नागरिकांशी संवाद ठेवणाऱ्या, सहकार्याची भावना जपणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांचा विशेष सन्मान होता. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्यात काहीसा भावनिक सूर उमटलेला असला, तरी त्यांच्या पदोन्नतीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरीसारख्या शांत आणि समंजस जिल्ह्यात त्यांनी पोलीस यंत्रणेचा चेहरा अधिक विश्वासार्ह बनवला. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता राज्य गुप्तवार्ता विभागाला मिळणार आहे, हे नक्की.

आणखी वाचा