रत्नागिरी, दि. २ : कोकणात मनसेचा पाया रचणारे, खेड नगरपरिषदेवर मनसेचा पहिला झेंडा फडकवणारे आणि पक्षाशी दोन दशकांहून अधिक काळ निष्ठेने जोडले गेलेले वैभव खडेकर सध्या पक्षातील काही घडामोडींमुळे नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यांच्या व्हाट्सअॅप स्टेटसपासून ते त्यांनी थेट राज ठाकरे यांची भेट मागितल्यापर्यंत अनेक गोष्टींनी या चर्चांना अधिक बळ दिलं आहे.
“माझ्या सारख्या अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होतोय. आम्ही राज साहेबांकडे भेटीची वेळ मागितली आहे. आम्हाला आमचा आवाज त्यांच्या पर्यंत पोचवायचा आहे. पण मी पक्ष सोडतोय, असं मी कधीही म्हटलेलं नाही,” असं स्पष्ट वक्तव्य वैभव खडेकर यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना केलं.
खडेकर यांच्या नाराजीमागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षप्रमुखांनी अवैध ठरवून रद्द केल्या. त्याच वेळी, एका व्यासपीठावर शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, योगेश कदम यांच्यासोबत उपस्थित असताना खडेकर यांना शिवसेनेत प्रवेशाची थेट ऑफर मिळाली. या घटनाक्रमांमुळे खडेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
व्हॉट्सअॅपवर ठेवलेलं “निष्ठावंत कार्यकर्त्यांना कवडीची किंमत नसते” हे स्टेटस, वाघाचा आणि कारमधून उतरताना ‘जय महाराष्ट्र’ म्हणतानाचा व्हिडीओ या सर्व गोष्टी त्यांच्या मनात चाललेल्या अस्वस्थतेचं प्रतिबिंब असल्याचं मानलं जातं.
राजकीय वर्तुळात हा अस्वस्थतेचा सूर अधिक तीव्र होतो तेव्हा, खडेकर यांनी सांगितलं, “मी पक्ष स्थापनेपासून राज साहेबांसोबत आहे. त्यासाठी आम्ही अनेक राजकीय संघर्षांना सामोरे गेलो. आमचा व्यवसाय, कुटुंब यावरही त्याचा परिणाम झाला. पण काही मंडळी साहेबांना चुकीची माहिती पोहोचवत आहेत. विशेषतः शिवाजी पार्क मित्र मंडळ यांच्याकडून हे घडतंय.”
दरम्यान, मनसेतून बाहेर पडलेले संतोष उर्फ बंड्या शिर्के यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत पुनरागमन केलं. त्यामुळे दापोलीतील आगामी राजकीय समीकरणंही बदलू लागली आहेत. अशा वेळी खडेकर यांची नाराजी आणि भेटीसाठीची प्रतीक्षा पक्षासाठी एक गंभीर संकेत मानली जात आहे.
“राज साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी आम्हाला वेळ द्यावी, यासाठी आम्ही वर्षभर वाट पाहतोय,” असं बोलकं विधान करत खडेकर यांनी आपली निष्ठा अधोरेखित केली आहे. पण ही भेट यापुढेही लांबली, तर खडेकर यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण कोकणाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.