चिपळूण, दि. ०६ (प्रतिनिधी): “वणवामुक्त अभियान यशस्वी करायचे असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातून आणि शेजारच्या जमिनीतून वणवा होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी,” असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे केले. चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या खैर रोपांचे मोफत वाटप व वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना साडेपाच लाख खैर जातीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, रमेश कदम, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपवन संरक्षक गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी रणजीत गायकवाड, सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, “प्रॅक्टिकली अनुभव असलेला शेतकरी हा केवळ ज्ञानावर आधारित तज्ज्ञांपेक्षा अधिक प्रभावी असतो. वणवामुक्तीची जबाबदारी शासकीय यंत्रणेबरोबरच शेतकऱ्यांचीदेखील आहे. जर प्रत्येक शेतकरी काळजीपूर्वक वागला, तर ३५ ते ४० टक्के वणवे आपोआप रोखले जातील. जाणीवपूर्वक वणवा लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल व्हावेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.”
खैर लागवडीतून उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल
शेतकऱ्यांकडे कमी जागा असली तरी योग्य मार्गदर्शन व मदतीने त्यामध्ये खैर लागवड करून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकतो. खैर लागवड करण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना मोफत रोपं देण्याची भूमिका *जिल्हा नियोजन समिती (DPC)*च्या माध्यमातून घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात अशा योजना मंजूर करण्याचा शब्दही पालकमंत्र्यांनी दिला.
‘देवराईत लागवडीची सक्ती










