रायगड लोकसभा मतदार संघ परिवर्तन व पुनरागमनाचा साक्षीदार ; बॅ. अंतुलेंप्रमाणे अनंत गीते यांनादेखील पुनरागमनाची संधी देणार?

रायगड म्हणजे पुर्वीचा कुलाबा लोकसभा मतदार संघ असून कुलाबा लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रीय मंत्री झाल्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या उमेदवाराचा म्हणजेच बॅ.अंतुले यांचा पराभव  असे अघोषित समीकरण अस्तित्वात होते. मात्र, या समीकरणासोबतच बॅ.अंतुले यांना त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी करून पुनरागमनाची संधीही या कुलाबा लोकसभा मतदार संघाने वेळोवेळी दिल्याचे दिसून येत आहे. कुलाबा लोकसभा मतदार संघाची अघोषित समीकरणे जर रायगड लोकसभा मतदार संघामध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री पदावर राहिलेल्या अनंत गीते यांच्या पराभवास कारणीभूत ठरली असतील तर त्याच अघोषित समीकरणांनी अनंत गीते पुन्हा लोकसभेवर निवडून जाण्यासाठी रायगड लोकसभा मतदार संघ गीते यांचे बॅ.अंतुले यांच्याप्रमाणे पुनरागमन करणार काय, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गोविंदराव निकम यांच्याकडून पराभूत होऊन शिवसेनेची उमेदवारी शाबूत ठेवणाऱ्या अनंत गीते यांना बाबरी मशिद पतनानंतरच्या भगव्या लाटेमध्ये खा.गोविंदराव निकमांना पराभूत करून पहिल्यांदा खासदारकीची संधी रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून मिळाली होती. 1996-1998 पासून खा.अनंत गीते यांनी सलग 1998-1999, 1999-2004 आणि 2004-2009 अशी चारवेळा खासदारकी मिळवून नव्याने पुनर्रचना झालेल्या रायगड लोकसभेची पाचव्यांदा उमेदवारी मिळणार हे गृहित धरून मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासंदर्भात केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री अंतुले यांच्या विधानाबाबत संसदेमध्ये चर्चा घडवून अंतुलेंविरोधात ते देशविरोधी असल्याचे वातावरण निर्मिती करण्यात यश मिळवले होते. खा.गीते यांना 4 लाख 13 हजार 546 मते तर बॅ.अंतुले यांना 2 लाख 67 हजार 25 मते मिळाली. बॅ.अंतुले यांच्यासमोर पुनर्रचित रायगड लोकसभा मतदार संघात सक्षम उमेदवार उपलब्ध नसल्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी शेकापक्ष हा रायगड जिल्हा परिषदेतील महायुतीच्या वळचणीला गेला होता तसेच शेकापक्षाचे प्राबल्य असलेले कुलाबा-3 लोकसभा मतदार संघातील पनवेल, उरण व कर्जत हे विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदार संघाला जोडले गेले तर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे मतदार संघ रायगड लोकसभेला जोडले गेले.

यापैकी महाड हा विधानसभा मतदार संघ अनंत गीते यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या रत्नागिरी लोकसभा मतदार संघापैकी असून कुलाबा लोकसभा मतदार संघाच्या पुनर्रचित रायगड लोकसभा मतदार संघाचे पहिल्यांदाच उमेदवार राहिलेल्या अनंत गीते यांनी बॅ.अंतुले यांचा पराभव केला. यानंतर रायगड लोकसभा मतदार संघातील 16 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये खा.गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मते मिळाली तर ना.तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68 मते मिळाली आणि खा.गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले. तिसऱ्या स्थानावर 1 लाख 29 हजार 730 मते मिळवित शेकाप मनसे युतीचे रमेश कदम राहिले. या निकालांनी अनंत गीते यांच्या विरोधातील मतदारांचा कौल उघड झाला असूनही त्यांना केंद्रात पाच वर्षे अवजड उद्योगमंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते पुन्हा मतदार संघावर घट्ट पकड करतील,अशी अपेक्षा होती.

मात्र, रायगड लोकसभा मतदार संघाने कुलाबा लोकसभा निवडणुकीप्रमाणे केंद्रात मंत्री झालेल्या उमेदवाराचा पराभव करण्याचे सुत्र कायम ठेवले.  मागील लोकसभा निवडणुकीत तटकरे यांच्या निसटत्या पराभवाचे विश्लेषण करताना गीते यांची घटती लोकप्रियता ही केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच नव्हती तर विकासकामे न करता सातत्याने मिळणाऱ्या विजयामुळेही होती. ‘नोटा’बटनाचा वापर तब्बल 20 हजार 362 मतदारांनी केल्यामुळे तसेच सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या सुनील तटकरे या अपक्ष उमेदवाराला 9 हजार 849 मते मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचा पराभव झाल्याचे उघड झाले आहे. बॅ.अंतुले यांना पराभूत केल्यानंतरच्या दुसऱ्या लढतील अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांचा निसटता पराभव केला. तेव्हा रायगड लोकसभा मतदार संघाच्या दुसऱ्या लढतीत ना. तटकरे यांनी गुहागर 63 हजार 123, श्रीवर्धन 72 हजार 167 तर अलिबाग 67 हजार 38 असे विधानसभा मतदारसंघनिहाय पहिले स्थान पटकाविले तर पेण 64 हजार 375, महाड 65 हजार 227 आणि दापोली 62 हजार 77 मते मिळवून ना. तटकरे दुसऱ्या स्थानावर राहिले.  शिवसेनेचे उमेदवार खा.गीते यांनी महाड 82 हजार 55, पेण 68 हजार 012 आणि दापोली  79हजार 664 असे मतदारसंघनिहाय पहिले स्थान पटकाविले. श्रीवर्धन 58 हजार 674 आणि गुहागरमध्ये 60 हजार 549 मते मिळवित खा.गीते दुसऱ्या स्थानावर राहिले.

गीते यांना रायगड लोकसभा मतदार संघाचे ‘केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पराभव अटळ’ या अनाकलनीय राजकीय गृहितकाचे परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना 4 लाख 86 हजार 968 मते मिळवित विजय संपादन करता आला तर अनंत गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते मिळवूनही 31434 मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

रायगड लोकसभा मतदार संघ केंद्रीयमंत्र्याचा पराभव करून पुनरागमनाची संधी देणारासुध्दा-

बॅ.अंतुले यांच्यावर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिवसेनेने कुलाबा लोकसभा मतदार संघात 1998 मध्ये बॅ.अंतुले यांच्यासमोर अनंत तरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. शेकापक्षाने मात्र आर्थिक बलाढय रामशेठ ठाकूर यांना रिंगणात आणून बॅ.अंतुले यांच्यासमोर आव्हान उभे केले. मतमोजणीच्या शेवटच्या काही फेऱ्या बाकी असताना मतांची आघाडी पाहून बॅ.अंतुले यांनी विजयी झाल्याच्या खात्रीने दिल्लीला शरद पवार यांच्यासमवेत प्रयाण केले आणि दिल्लीच्या भूमीवर पाऊल पडण्यापूर्वीच ते शेकापक्षाचे उमेदवार रामशेठ ठाकूर यांच्याकडून 9 हजार 126 मतांनी पराभूत झाल्याचे वृत्त थडकले. यापुढील 1999 च्या मध्यावधी निवडणूकीमध्ये बॅ.अंतुले यांनी कुलाबा 3 ऐवजी औरंगाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यामुळे शेकापक्षाचे रामशेठ ठाकूर यांच्यासमोर काँग्रेसच्या नवख्या उमेदवार पुष्पा साबळे यांची उमेदवारी खूपच केविलवाणी ठरली तर शेकापक्षाकडून दोनवेळा खासदारकी मिळविलेले दि.बा.पाटील यांनी राजकीय मुंडण करून शिवसेनेतर्फे उमेदवारी केली. शिवसेना चौथ्यावेळा पराभूत झाली आणि रामशेठ ठाकूर दुसऱ्यांदा खासदार झाले.

2004 मध्ये बॅ.ए.आर.अंतुले यांचे कुलाबा-3 लोकसभा मतदार संघामध्ये राजकीय पुनरागमन झाले. यावेळी बॅ.अंतुले यांच्यासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापक्षाचे ऍड.दत्ता पाटील आणि दि.बा.पाटील हे प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह उतरले. शेकापक्षाचे विवेक पाटील आणि शिवसेनेचे श्याम सावंत यांचा बॅ.अंतुले यांनी पराभव करून चौथ्यांदा लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व मिळविले. बॅ.अंतुले हे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कार्यरत असताना 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसतर्फे नव्याने पुनर्रचना झालेल्या रायगड-32 लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळीसुध्दा केंद्रात मंत्री म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभव नक्की अशी अवस्था बॅ.अंतुले यांची झाली. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री बॅ. अंतुले यांच्याविरोधात अनंत गीते यांना पहिल्यांदा विजयाची संधी भेटली. ज्याप्रमाणे मागील 17 व्या लोकसभेमध्ये अनंत गीते यांचा माजी केंद्रीय मंत्री म्हणून उमेदवारी करताना पराभव झाला ते पाहता रायगड लोकसभा मतदार संघ गीते यांना पुनरागमनाची संधीदेखील यावेळी देऊ शकतो. मात्र, राज्य आणि देशातील विविध राजकीय पक्षांचे विलगीकरण आणि धु्रवीकरणाच्या पार्श्वभुमीवर रायगड लोकसभा मतदार संघाचा केंद्रीय मंत्र्याचा पराभव आणि पराभवानंतरच्या लोकसभा निवडणुकीवेळी पुनरागमन करण्याचा प्रघात कायम राहतो अथवा कसे, हे या लोकसभा निवडणुकीनंतर समजून येणार आहे.

– ज्येष्ठ पत्रकार श्री शैलेश पालकर

आणखी वाचा