दापोली, दि. २७ (प्रतिनिधी): समाजाच्या नावावर आणि शिवसेना या चार अक्षरावर अनंत गीते तुम्हाला यश मिळाले परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आणि भाजप माझ्यासोबत आहे त्यामुळे या निवडणुकीत यश हमखास मिळणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी फणसू येथील महायुतीच्या प्रचार सभेत व्यक्त केला.
काही गोष्टी विधीलिखित असाव्या लागतात. अनंत गीते तुम्ही सत्तेसाठी मंत्री होतात मी मात्र सत्तेत सेवा करण्यासाठी आलो आणि ती सेवा करण्याची संधी मिळाली आणि कुणबी समाजाला पाच कोटी रुपये अजितदादा पवार यांच्याकडून मिळवून दिले याची माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. १६ व्या खासदारकीचा अडीच कोटी रुपयांचा निधी अनंत गीते खर्च करु शकले नाहीत. खासदार निधीसुध्दा वापरता येत नाही असा निष्क्रिय खासदार लाभला असून निष्क्रियतेविरुद्ध सक्रियतेची लढाई आहे असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदाच घड्याळ चिन्हावर मतदान करणार आहात.
यावेळी खासदारकीसाठी धनुष्यबाण ऐवजी घड्याळ चिन्ह असणार असून चार महिन्याने धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून विधानसभेसाठी आमदार योगेश कदम यांना विजयी करण्याचे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले. धर्म – जात यामध्ये गल्लत करत काही शक्ती पाप करत आहेत मात्र हे पाप करणारे निवडणूका संपल्यानंतर मतदारसंघात दिसणार पण नाही. परंतु आम्ही तुमच्या सेवेसाठी एटीएमसारखे उपलब्ध राहणार आहोत. कोकणाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी…राष्ट्रहितासाठी मला पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. मतदारांनो अपप्रचारांना बळी पडू नका. उध्दव ठाकरे यांनी व त्यांच्या लोकांनी केलेले हे कपटी कारस्थान आहे.
या मतदारसंघातील सर्व मुस्लीम मोहल्लांचा विकास मी केला आहे असा दावा रामदास कदम यांनी केला. शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सर्व नेत्यांना या उध्दव ठाकरेंनी घरी बसवले असे सांगतानाच मुस्लिम समाजाची मते घेण्यासाठी उध्दव ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतो असा थेट आरोप रामदास कदम यांनी सभेत केला. या जिल्हा परिषद गटातील ३२ गावांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि पाठिशी राहिले आहेत. या दापोली मतदारसंघातील प्रत्येक गावात एक कोटीच्यावर निधी दिला आहे. लोकांना विकासकामे हवी आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सुनिल तटकरे यांना घड्याळ चिन्हावर मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन आमदार योगेश कदम यांनी केले. सुनिल तटकरे यांना मतदान कराल ते योगेश कदम यांना मतदान होणार आहे हे लक्षात घेऊन मतदान करा असेही योगेश कदम यांनी सांगितले. आसोंड जिल्हा परिषद गटातील फणसू येथे महायुतीची प्रचार सभा पार पडली. सकाळी केळशी येथे प्रचार सभा झाल्यानंतर संध्याकाळी फणसू येथे सभा पार पडली.
या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, दापोली – मंडणगडचे आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे,राष्ट्रवादीचे संदीप राजपुरे, शिवसेनेचे अनंत करंबळे, आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.








