रत्नागिरी, दि. १२ (प्रतिनिधी): दोरीने दरवाजा बांधलेल्या 108 रुग्णवाहिकेचा प्रकार प्रकाशात आल्यानंतरही जिल्ह्यातील आपत्कालीन सेवेत कोणताही बदल न झाल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी माध्यमांतून उघड झालेल्या निष्काळजीपणानंतरही संबंधित विभागाची हालचाल न दिसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही काय आपत्कालीन सेवा, की नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करणारे ‘मोबाईल शववाहन’? असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
जिल्ह्यातील अनेक 108 रुग्णवाहिकांची स्थिती अतिशय वाईट आहे — तुटलेले दरवाजे, गंजलेली बॉडी, नादुरुस्त ऑक्सिजन सिलिंडर, बंद एसी, निकामी वैद्यकीय उपकरणे… अशा अवस्थेत ही वाहने रुग्णांना घेऊन धावत आहेत. दरवाजा बंद करण्यासाठी दोरीचा आधार घ्यावा लागणाऱ्या रुग्णवाहिकेचा प्रकार उघड झाल्यानंतर तातडीने दुरुस्ती, तपासणी किंवा कारवाई होणार अशी अपेक्षा होती; पण त्यावर पडदा टाकल्यासारखे सर्वकाही पूर्ववतच आहे.
108 रुग्णवाहिकांची नियमित तांत्रिक तपासणी कागदोपत्री अनिवार्य असली तरी प्रत्यक्षात ती केवळ कागदांवरच मर्यादित राहिल्याचे दिसते. काही वाहनांची अवस्था एवढी दयनीय असतानाही ती सेवा देत असल्याने तपासणी व्यवस्थेची पोकळी उघड झाली आहे. या प्रकारांवर आरोग्य विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणती ठोस भूमिका घेतलेली नाही. रुग्णांचा जीव तारेवर लोंबत असताना प्रशासनाचा हा शांतपणा अस्वस्थ करणारा आहे.
जीव वाचवणाऱ्या रुग्णवाहिकेला दरवाजा दोरीने बांधावा लागतो, वैद्यकीय उपकरणे निकामी पडतात, वाहन धोकादायक स्थितीत आहे… तरीही व्यवस्थापक आणि आरोग्य विभाग दगडासारखे शांत! ही प्रशासनाची उदासीनता नसून थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे, अशी टीका नागरिकांकडून होत आहे.
108 रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था वारंवार समोर येत असताना आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा अधिकच ठळक होत आहे. दरवाजा दोरीने बांधण्यासारखा गंभीर प्रकार “अत्यंत चुकीचे उदाहरण” ठरू शकतो… आणि उद्या एखादा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नेमके कोणाला संरक्षण दिले जात आहे?
हा सवाल आता अधिक तीव्र होत आहे.








