रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयोत्सवात भीषण चेंगराचेंगरी : ११ जणांचा मृत्यू, २० जखमी; विजयी मिरवणूक रद्द

बंगळुरू, दि. ०४ (वृत्तसंस्था): रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएल २०२५ मधील पहिल्या विजयानंतर सुरू झालेला जल्लोष काही तासांत शोकांतिका ठरला. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने चाहते स्टेडियम परिसरात जमले होते. विजय मिरवणूक पाहण्यासाठी आणि संघाच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा अनुभवण्यासाठी उत्साही तरुण-तरुणींनी वेगवेगळ्या गेट्सवरून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गर्दीत नियंत्रण सुटल्याने चेंगराचेंगरी झाली.
वाहतूक ठप्प, मदतकार्यात अडथळे
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बोरिंग रुग्णालयात हलवले. मात्र प्रचंड गर्दीमुळे रुग्णवाहिकांना मार्ग मिळवणे कठीण झाले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तिघांना मृत घोषित करण्यात आले, तर उर्वरितांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका तरुणाचा पाय गेटवरून खाली पडल्याने मोडला आहे.
फक्त १० हजार पोलीस, गर्दी ५ लाखांची!
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त असला तरी ५ लाखांहून अधिक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त १० हजार पोलिसांची तैनाती करण्यात आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. आयोजकांना संभाव्य गर्दीचा योग्य अंदाज नसल्याचा आरोप आता होत आहे.
विजयी मिरवणूक रद्द, उपमुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
चेंगराचेंगरीनंतर तातडीने विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी परिस्थितीबाबत जनतेची माफी मागितली. “गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. आम्हाला खेळाडूंचा सत्कार करायचा होता, पण सुरक्षा कारणास्तव मिरवणूक थांबवावी लागली,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
स्टेडियम परिसरात भयानक गर्दी
वाहन प्रवेशबंदीमुळे हजारो चाहते मेट्रोने स्टेडियमकडे येत होते. एमजी रोड आणि क्यूबन पार्क स्टेशनवर अक्षरशः पाय ठेवण्याजोगी जागा नव्हती. काही नागरिक झाडांवरही चढले होते.
राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु
घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने राज्य सरकारवर व्यवस्थेच्या अपयशाचा ठपका ठेवत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
BCCI ची प्रतिक्रिया
BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी आयोजकांवर टीका करत सांगितले की, “विजयोत्सवाचे नियोजन पुरेसे नियोजनबद्ध नव्हते. इतर संघांनी थोडा वेळ घेऊन शांततेत मिरवणुका घेतल्या होत्या, पण येथे अतिउत्साहातून घाई झाली.”
आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद एका भीषण दुर्घटनेने विरजला आहे. अत्याधिक गर्दी, अक्षम नियोजन आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे ही चेंगराचेंगरी झाली. राज्य सरकार व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे.

आणखी वाचा