भीमगीताच्या स्वरांनी पुण्यात भारावणार वातावरण ; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची राज्यस्तरीय वैयक्तिक गायन स्पर्धा १५-१६ डिसेंबरला

पुणे | प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे ‘भीम गीत : वैयक्तिक गायन स्पर्धा’ जाहीर करण्यात आली आहे. दि. १५ व १६ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून, डॉ. आंबेडकर यांच्या कार्य, विचार आणि योगदानाचे गुणगान करणारी मराठीतील गीतं या स्पर्धेत सादर केली जाणार आहेत. युवा गायकांना डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी जवळीक साधण्याची आणि आपली कला सादर करण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.

ही स्पर्धा फक्त एकल गायनासाठी असून १८ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. नोंदणी करताना आधार किंवा पॅन कार्डची प्रत अपलोड करणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांनी स्वतःचे वाद्यवादक सोबत आणणे अपेक्षित असून हार्मोनियम, तबला, ढोलक अथवा कीबोर्ड यांसारखी साथसंगत वाद्ये बरोबर आणता येतील. आवश्यकतेनुसार काही वाद्ये आयोजक संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

गीत सादरीकरणासाठी एकूण १० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल आणि गीत मराठी भाषेतीलच असावे, अशी अट घालण्यात आली आहे. नोंदणीसाठी माहितीपत्रकावर दिलेल्या लिंक किंवा QR कोडद्वारे स्पर्धकांनी आपले नाव, आवश्यक माहिती तसेच स्वतःच्या गायनाचा व्हिडिओ अपलोड करणे अनिवार्य आहे.

व्हिडिओद्वारे पाठवलेल्या गीतांच्या आधारे निवड प्रक्रिया होणार असून, निवड झालेल्या स्पर्धकांनाच प्रत्यक्ष स्पर्धेसाठी बोलावले जाईल. व्हिडिओ पाठवताना वाद्यांची साथसंगत बंधनकारक नसली, तरी प्रत्यक्ष स्पर्धेत तेच गीत सादर करणे अनिवार्य असेल. व्हिडिओ १ डिसेंबर २०२५ पूर्वी पाठवणे आवश्यक आहे.

कराओके किंवा साऊंड ट्रॅकच्या सहाय्याने गायन करण्याची परवानगीही स्पर्धकांना देण्यात आली आहे. नोंदणी शुल्क रु. १०० असून, व्हिडिओ निवडीनंतरच हे शुल्क प्रबोधिनीच्या अधिकृत क्रमांकावर भरायचे आहे.

स्पर्धेचे परीक्षण संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षकांकडून करण्यात येणार असून निर्णय अंतिम मानले जातील.
विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत—
प्रथम क्रमांक : रु. ५०,०००
द्वितीय क्रमांक : रु. ३५,०००
तृतीय क्रमांक : रु. २५,०००
तसेच रु. १५,००० ची चार उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धक आणि सहवादकांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून विनाशुल्क करण्यात आली असून, नातेवाईक किंवा सोबत आलेल्या इतर व्यक्तींना ही सुविधा उपलब्ध राहणार नाही. प्रवास व निवासाची व्यवस्था स्पर्धक व सहवादकांनी स्वतः करायची आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित नव्या पिढीतील गायकांना प्रोत्साहन देण्याचे, कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आणि महापरिनिर्वाण दिनाच्या स्मरणार्थ सांस्कृतिक अभिवादन करण्याचे हे उद्दिष्ट प्रबोधिनीने व्यक्त केले आहे.

आणखी वाचा