रायगड जिल्ह्यात थंडीची चाहूल, अल्हाददायक वातावरणामुळे पर्यटनाला उत्साह

पाली/बेणंसे, दि. १७ (धम्मशील सावंत) : रायगड जिल्ह्यात यंदा संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर परतीचा पाऊस कायम राहिल्याने उकाड्याचा त्रास जाणवलाच नाही. पारंपरिक ‘ऑक्टोबर हिट’ अनुभवण्यासाठी ओळखला जाणारा हा महिना यंदा मात्र पूर्णपणे गार व दमट हवामानाचा ठरला. काही दिवसांपूर्वी परतीचा पाऊस थांबताच जिल्ह्यात सकाळी आणि रात्री गारव्याची चाहूल लागली असून थंडीची सुरुवात स्पष्ट जाणवू लागली आहे.

पहाटे उठताच जिल्ह्यातील परिसरावर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. रस्त्यांवर पसरलेल्या दाट धुक्यामुळे वाहतूक मंदावली असली तरी प्रवासी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी हे वातावरण खूप आनंददायी ठरत आहे. सकाळची झुळूक, डोंगरांवर तरंगणारे पांढरे आणि करडे ढग, आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई यामुळे रायगडमधील निसर्ग आज जणू स्वर्गीय भासतोय. दुपारीही वातावरणात हलका गारवा टिकून राहतो आहे, त्यामुळे जिल्ह्यात फिरण्यासाठी आणि निसर्ग पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे.

ताम्हिणी घाट, वरंधा घाट, मोर्बे घाट यांसारख्या डोंगर घाटांमध्ये धुक्याच्या सान्निध्यातून प्रवास करणे पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरत आहे. ढग आपल्या अगदी जवळून सरकतात, कधी कधी कारसमोरच पांढऱ्या धुक्याची चादर उतरते, अशा दृश्यांनी हे ठिकाण नेहमीच पर्यटकांना वेधून घेत असते. रायगड, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड, कर्नाळा यांसारख्या उंच किल्ल्यांवर तर ढगांची वाहती गर्दी आणि हलके धुके कायम पसरलेले असते. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्स या वातावरणात किल्ले-दुर्गभ्रमंतीचा मनसोक्त आनंद घेत आहेत.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, ओहोळ आणि डोंगरधारे अजूनही ओथंबून वाहत आहेत. लहान-मोठे धबधबे अखंडपणे वाहत असल्यानं पाणी, ढग आणि हिरवळ यांचा अद्भुत संगम पर्यटनाला अधिक आकर्षित करतो आहे. अनेक ठिकाणी तर पर्यटक पाण्यात डुंबत हा थंडावा आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवत आहेत.

दरम्यान, हवामानातील बदलामुळे काही गावांमध्ये रात्री तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. थंडीची ही सुरुवात लोकांना आनंददायी वाटत असून थंड गार वाऱ्यामुळे पहाटे उठणे, फिरणे आणि प्रवास करणे खूपच सुखद ठरत आहे.

निसर्ग अभ्यासक शंतनू कुवेसकर यांच्या मते, “जिल्ह्यातील पाणवठे, नदी आणि छोटे-मोठे धबधबे अजूनही तजेलदार वाहत आहेत. ढगांची चादर, धुक्याचा स्पर्श आणि पाण्याचा खळकळ आवाज ऐकण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने रायगडला येत आहेत. येथील निसर्ग, प्राणी-पक्ष्यांचे जीवन आणि स्वच्छ हवा हे सर्व मिळून वातावरण अत्यंत नयनरम्य बनवते.”

रायगड जिल्ह्यातून जाणारे मुंबई-गोवा, मुंबई-बेंगळूरू आणि मुंबई-पुणे मार्ग दाट धुक्याच्या आच्छादनाखाली असले तरी पर्यटनात वाढ होताना स्पष्टपणे जाणवत आहे. हवामानातील हा बदल सर्व वयोगटांना आकर्षक वाटत असून पुढील काही दिवसांतही पर्यटनात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

आणखी वाचा