उत्तर भारतातील अघोरी बाबा निवडणुकीसाठी अलिबागमध्ये!

धार्मिक वातावरणाचा आरोप करून चर्चांना उधाण

अलिबाग, दि. ३० : नगरपालिका निवडणुकांचे राज्यात वातावरण तापत असताना अलिबाग शहरात एक वेगळीच चर्चा रंग घेत आहे. कोळीवाडा परिसरात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेले अघोरी बाबा फिरू लागल्याने निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरभर पसरली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही अनपेक्षित घटना घडली की लोक संशयित नजरेने तिच्याकडे पाहतात. समाज शिक्षित झाला असला तरी काही रूढी, श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा प्रभाव अजूनही दिसतो. त्यातच निवडणुकीच्या काळात अघोरी बाबांची वाढलेली हालचाल नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

शहरात काहीजण दावा करत आहेत की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळी जादू किंवा तांत्रिक प्रयोग केल्याची चर्चा ऐकू येत आहे. काही ठिकाणी उमेदवार मतदारांना विविध मार्गाने प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी बुवाबाजीचा मार्गही वापरला जात असल्याचे नागरिक सांगतात.

अघोरी बाबा नेमके कोणत्या कारणासाठी अलिबागमध्ये आले आहेत, त्यांचा कोणत्या गटाशी किंवा उमेदवाराशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र निवडणुकीच्या उंबरठ्यावर अशा हालचाली दिसू लागल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

अलिबाग नगरपालिका निवडणुकीचा प्रचार वेग पकडत असताना या अघोरी बाबांच्या वावराने शहरात राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा