रायगड, दि. २८ ऑक्टोबर : कर्जतच्या सायडोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “गुजरातच्या उद्योगपतींसाठी महाराष्ट्राचा सह्याद्री पोखरणार का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केंद्रातील दोन नेत्यांकडून शून्य किंमत दिली जाते,” असा घणाघात त्यांनी केला. कर्जत येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
कर्जत परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षे उभी असलेली जुनी झाडे तोडून लाकडांचे ढीग रचण्यात आले आहेत. ते दृश्य पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखे वाटले. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पाची आवश्यकता, त्याचे फायदे आणि त्यामागील निर्णयप्रक्रिया जनतेसमोर स्पष्ट करण्याची मागणी केली.
“मुंबई गुजरातला जोडण्याची मनिषा?”
मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जमिनी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती खासगी उद्योगांच्या फायद्यासाठी वापरली जात आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या प्रकल्पाची चर्चा ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि विधानसभेत झाली का? प्रकल्पाला मंजुरी देताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
प्रकल्पातून निर्माण होणारी वीज नेमकी कोणाला मिळणार, तिचे वितरण कोण करणार आणि त्याचा महाराष्ट्राला किती फायदा होणार, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात उभारल्या जाणाऱ्या डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी लागणार असल्याचे सांगत या प्रकल्पांचा फायदा सर्वसामान्यांना होणार की खासगी उद्योगांना, असा सवालही त्यांनी केला.
“कुऱ्हाडीचा आवाज येतो; देवाच्या काठीचा येत नाही!”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही. ती ज्या दिवशी बसेल, त्या दिवशी तुम्ही केलेली पापे आठवतील.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा नामोल्लेख न करता त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत आणि जमिनीच्या हस्तांतरणाबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील प्रकल्पांबाबतचे निर्णय राज्यातील जनतेच्या हिताला प्राधान्य देऊनच घेतले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
“महाराष्ट्राने जागे होण्याची वेळ आली आहे”
राज ठाकरे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. “मी उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही. महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि नागरिकांच्या घरात वैभव आले पाहिजे. मात्र, महाराष्ट्राचा विकास कसा व्हावा, हे महाराष्ट्राने ठरवले पाहिजे; बाहेरच्या लोकांनी नव्हे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
राज्यातील जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. “महाराष्ट्र जिवंत आहे की नाही, हे जनतेने ठरवायचे आहे. महाराष्ट्र राहिला पाहिजे आणि तो मराठी माणसांचा राहिला पाहिजे,” असे सांगत या प्रकल्पाविरोधातील लढ्याला आपण साथ देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्जतच्या प्रस्तावित प्रकल्पावरून आता पर्यावरण संरक्षण, स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि राज्याच्या विकासाच्या दिशेबाबत राजकीय वाद तीव्र होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्य सरकार आणि संबंधित कंपनीची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.








