घटनेची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. सावर्डे येथील परिमंडळ वन अधिकारी सुरेश उपरे, वनरक्षक अश्विनी जाधव आणि वन्यजीव बचाव पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आदर्श शाळा, येगाव क्रमांक १ येथे जाऊन विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले. वन्यप्राणी दिसल्यास त्यांच्या जवळ जाणे, त्यांना त्रास देणे किंवा त्यांचा पाठलाग करणे टाळावे, तसेच तातडीने मोठ्यांना आणि वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. संबंधित परिसरात कॅमेरे बसविण्याचे आश्वासनही वनविभागाकडून देण्यात आले.
या वेळी माजी सरपंच सचिन चव्हाण, ग्रामसेवक शंतनू अय्यर, ग्रामपंचायत कर्मचारी विजय नाचरे, सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव, मुख्याध्यापक संजय घाग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक तांदळे, तलाठी नारायण कणसे, डेटा ऑपरेटर वर्षा होडे तसेच वन्यजीव बचाव पथकाचे मयूर सकपाळ आणि रितेश घाग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळा परिसरात नियमित गस्तीची मागणी
शाळेजवळ वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने परिसरात कॅमेरे बसवून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, नियमित गस्त घालावी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वनविभागाने तातडीने दखल घेऊन शाळेला भेट दिल्याबद्दल परिमंडळ वन अधिकारी सुरेश उपरे आणि त्यांच्या पथकाचे ग्रामस्थांनी आभार मानले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता वनविभागाच्या पुढील कार्यवाहीकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








