भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी रत्नागिरीत “पाणी परिषद”

आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती; जलसंधारण, पाणी नियोजनावर भर

रत्नागिरी, दि. २९ (प्रतिनिधी) : पावसाचे घटते प्रमाण आणि संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जलस्रोतांचे संवर्धन, पावसाचे पाणी अडविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी रत्नागिरीत ‘जिल्हा शाश्वत पाणी परिषदे’चे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या परिषदेला आमदार प्रमोद जठार उपस्थित होते. परिषदेतील चर्चेच्या आधारे आराखडा तयार करून तो पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज अधोरेखित केली. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यापेक्षा पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. रत्नागिरीतील फणशी येथे २०१९ मध्ये ‘फ्लोटिंग रिडबेड सिस्टीम’द्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दापोलीतील जलतज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे यांनी पाणी बचतीच्या सवयी प्रत्येकाने अंगीकारण्याचे आवाहन केले. हॉटेल, घरे आणि बहुमजली इमारतींमधील सांडपाणी तसेच वातानुकूलित यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी संकलित करून त्याचा पुनर्वापर करावा, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन युवकांनी ‘जलदूत’ आणि ‘जलयोद्धे’ म्हणून पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

जलदूतांचा सन्मान; टँकरमुक्त गावांसाठी मागणी

परिषदेत जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजलपातळी वाढविणे, पाणीगळती रोखणे आणि पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन यावर चर्चा झाली. विविध संस्थांचे प्रतिनिधी, जलसेवक आणि जलप्रेमींना जलसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चिपळुणचे शाहनवाज शहा यांनी टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनुभवी जलदूतांना पंचायत समिती आणि प्रशासनाच्या पाणीटंचाई आढावा बैठकांमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी केली. ‘टँकरमुक्त व जलयुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हॉटेल व्यावसायिकांकडूनही पाणी बचतीचा निर्धार

हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी ग्राहकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे, टब बाथचा वापर टाळणे आणि एसीमधून मिळणारे पाणी झाडांसाठी वापरणे यांसारख्या उपायांची माहिती दिली. डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी प्रत्येक थेंबाचे महत्त्व सांगत पुढील सात महिने पाणी वाचविण्याचे आणि आगामी पावसाळ्यात पाणी अडविण्याचे आवाहन केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी पाणी बचतीवर प्रभावी पथनाट्य सादर केले. प्रा. सचिन सनगरे आणि डॉ. चित्रा गोस्वामी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपायांसाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज या परिषदेतून अधोरेखित झाली.

आणखी वाचा