साखरपा, दि. ०१ (भरत माने): कोंडगाव (साखरपा) येथे वास्तव्यास असलेले आणि साखरपा बाजारपेठेत किराणा मालाचे दुकान चालवणारे तरुण विवेक (विकी) गुरुपादगोळ यांनी प्रचंड इच्छाशक्ती व धैर्याच्या जोरावर साखरपा ते नेपाळ असा सुमारे ५४०० किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय बाईक रायडींग ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या साहसी कामगिरीचे साखरपा परिसरासह संपूर्ण भागात कौतुक होत आहे.
१२ डिसेंबर रोजी या प्रवासास सुरुवात करून विवेक यांनी साखरपा–मुंबई–इंदोर–कानपूर–नेपाळ–बुटवाल असा मार्ग अवघ्या दहा दिवसांत पार केला. २४ डिसेंबर रोजी साखरपा येथे या दौऱ्याची सांगता झाली. दररोज पहाटे ५ ते सायंकाळी ७ या वेळेत त्यांनी सरासरी ७०० किलोमीटरचा प्रवास केला. त्यामुळे हा प्रवास किती आव्हानात्मक होता, याची कल्पना येते.

या संपूर्ण प्रवासात त्यांची हिमालया ही बाईक त्यांची विश्वासू सोबती ठरली. या ट्रेकमध्ये कोल्हापूर येथील जयदीप नाळे हे त्यांचे सहकारी होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अधिक सुरक्षित व यशस्वी झाल्याचे विवेक यांनी सांगितले.
यापूर्वीही विवेक गुरुपादगोळ यांनी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लेह–लडाख, कन्याकुमारी असे तब्बल ७००० किलोमीटरचे बाईक ट्रेक पूर्ण केले आहेत. “व्यवसाय सांभाळत वर्षातून एकदा तरी वेगळे साहस करण्याचा प्रयत्न करतो. बाईक रायडींग हा केवळ छंद नसून तो मला नवी ऊर्जा देतो,” असे त्यांनी सांगितले. या प्रवासासाठी कुटुंबियांची साथ व देवाचा आशीर्वाद लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
भविष्यात हिमाचल प्रदेशातील ‘स्पिती’ (Spiti Valley) हा अत्यंत कठीण समजला जाणारा ट्रेक पूर्ण करण्याचे स्वप्न असल्याचे विवेक यांनी व्यक्त केले. तसेच बाईक रायडींग करणाऱ्या तरुणांनी सेफ्टी किटचा वापर करावा, वेगाची मर्यादा पाळावी, योग्य गियर शिफ्टिंग करावी आणि कोणतीही अतिशयोक्ती टाळावी, असा सल्ला देत त्यांनी नव्या रायडर्सना प्रेरणाही दिली.
“तरुण वयात फिरून घ्या, अनुभव घ्या. या छंदातून आनंद मिळतो आणि जगण्याची नवी उमेद निर्माण होते,” असे सांगत विवेक गुरुपादगोळ यांनी अनेक तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.








