मुंबई, १४ सप्टेंबर : गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्पर्धा होणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावरील सर्वोत्तम रीलला १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप पाच कला विभागांमध्ये करण्यात आले आहे. ‘नैवेद्य आणि परंपरा’ या विभागात गणेशोत्सवातील नैवेद्य, पारंपरिक पदार्थ आणि खाद्यपरंपरांचे सर्जनशील सादरीकरण करता येईल. ‘गणराज रंगी’ या विभागात गायन, नृत्य, वाद्यसंगीत, संगीत नाट्य, लोकनाट्य, दशावतार, नमन खेळे आदी सादरीकरण कलांचा समावेश आहे.
‘कलाधिपती गणपती’ या दृश्यकला विभागात चित्रकला, रेखाचित्र, शिल्पकला, रांगोळी आणि चित्रांकन सादर करता येईल. ‘शब्दसुमनांकित गणराय’ या साहित्यकला विभागात कविता, कथा, निवेदन, प्रवासवर्णन, सांस्कृतिक कथन, गणपती मंदिरे, गणेशस्थळे आणि लोककथांशी संबंधित अनुभव सादर करता येणार आहेत. ‘एआयमधून गणपतीचे नवदर्शन’ हा विशेष विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कलात्मक सादरीकरणासाठी ठेवण्यात आला आहे.
प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाला २५ हजार, द्वितीय क्रमांकाला १५ हजार आणि तृतीय क्रमांकाला १० हजार रुपये, तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
रील उभी (९:१६) आणि ३० ते ९० सेकंदांची असणे आवश्यक आहे. ती स्पर्धकाच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम आणि फेसबुक खात्यावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी filmcityganeshareel.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.








