रत्नागिरी, दि. १३ : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे परिसरातून लाखो गणेशभक्त आपापली वाहने घेऊन कोकणाकडे रवाना झाले आहेत. एकीकडे माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच आता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सीएनजीचा अपुरा पुरवठा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सीएनजी भरण्यासाठी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, ऐन सणासुदीत प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून मोठ्या संख्येने नागरिकांनी सीएनजी वाहने घेतली आहेत. मात्र महामार्गावर सीएनजीचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सीएनजी पंपांची संख्या मर्यादित असून, उपलब्ध पंपांनाही मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
पनवेलनंतर पेण, रोहा, नागोठणे, माणगाव, इंदापूर, महाड, पोलादपूर आणि त्यानंतर खेड येथे सीएनजी पंप उपलब्ध आहेत. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने या पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासाचा वेळ वाढत असून, वाहनचालकांना अतिरिक्त मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीएनजीचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी कैलास गांधी यांनी केली.
दरम्यान, इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहतूककोंडीची समस्या कायम असून राज्य पोलीस तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधिकारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत. राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधिकारी पुष्पा दिघे आणि माणगावचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्यासह पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत.
इंदापूर आणि माणगाव येथील कोंडीचा अपवाद वगळता माणगावपासून पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर राज्य वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभागाचे सुमारे २८० पोलीस कर्मचारी, एक पोलीस अधीक्षक, एक विभागीय पोलीस अधिकारी आणि २० अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक अभिजीत शिवतारे, रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपअधीक्षक आरांक्षा यादव, सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि उपअधीक्षक नयोनी साटम यांचे लक्ष आहे. तसेच जिल्हा प्रशासनासोबत काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महामार्गावर प्रवाशांना चहा-पाणी आदी सुविधा उपलब्ध करून मदत करत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच पंपांवरील गर्दीचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूककोंडीसोबतच इंधनासाठी होणारी प्रतीक्षा चाकरमान्यांच्या उत्साहावर पाणी फेरू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








