चाकरमान्यांचा कोकण प्रवास ‘जाम’ ; गणेशोत्सवाच्या गर्दीने मुंबई-गोवा महामार्ग फुलला; कोलाड-इंदापूर १० किमी जाम

सिंगल लेन, खड्डे अन् राँग साइड वाहनांमुळे चाकरमान्यांचा प्रवास संथ; दोन दिवसांत ३० हजार ६६१ वाहने कोकणात

अलिबाग : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीचे विघ्न कायम राहिले आहे. शनिवारी कोलाड ते इंदापूरदरम्यान तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने या मार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली होती. हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दोन ते तीन तासांचा खोळंबा सहन करावा लागला.

महामार्गाचे अपूर्ण काम, नागोठणे येथील खड्डे, इंदापूरमधील सिंगल लेन आणि बेशिस्त वाहनचालकांकडून राँग साइडने वाहने चालविणे, तसेच एकाच मार्गावर तीन-चार रांगा लावल्याने वाहतूककोंडीत मोठी भर पडली. खारपाड्यापासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असले तरी वाहनांची संख्या मोठी असल्याने पोलिसांचीही दमछाक झाली.

इंदापूर-माणगाव परिसरातही सलग दुसऱ्या दिवशी वाहतूककोंडीची समस्या कायम राहिली. शनिवारी सकाळपासूनच या मार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः इंदापूर ते माणगावदरम्यान वाहनचालकांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागले. या कोंडीचा फटका स्थानिक नागरिकांसह एसटी बस, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा आणि व्यावसायिकांनाही बसला.

गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे रवाना झाले आहेत. शनिवारी पहाटेपासूनच मुंबई-पुणे मार्गासह मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. वाहतूककोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालकांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून खालापूर टोलनाका, पाली फाटा आणि पालीमार्गे मुंबई-गोवा महामार्गावर जाण्याचा पर्याय स्वीकारला.

गेल्यावर्षी गणेशोत्सवातही अपूर्ण महामार्गाच्या कामामुळे चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. यंदा महामार्गाचे काम पूर्ण होऊन प्रवास सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागोठणे येथील खड्डे आणि इंदापूरमधील सिंगल लेनमुळे परिस्थिती पुन्हा जैसे थेच असल्याचे चित्र आहे.

‘बेशिस्त वाहनचालकांमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राँग साइडने वाहने टाकून वाहतूककोंडीला अडथळा निर्माण करू नये,’ असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांनी केले आहे.

दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत १४ हजार ८४० वाहने, तर १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत १७ हजार ७७१ वाहने कोकणाच्या दिशेने गेली. १२ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोन दिवसांत एकूण ३० हजार ६६१ वाहने कोकणात दाखल झाली आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

आणखी वाचा