देवरुख, दि. २ जानेवारी : जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्था देवरुख संघटनेच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाजाच्या वाडीवस्तीतील विकासकामांची आढावा बैठक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीत तालुक्यातील धनगर समाजासाठी सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाजाच्या वाडीवस्तीतील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, सामाजिक विकासाशी संबंधित कामांची माहिती घेतली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ कसा मिळेल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. समाजातील प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार निकम यांनी दिले.

या बैठकीला जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्था देवरुख संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण झोरे, उपाध्यक्ष तुकाराम येडगे, कार्याध्यक्ष सुनील बोडकर, सरचिटणीस अभिजित रामचंद्र शेळके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.
याच कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सौ. वैशाली अभिजित शेळके, LIC विमा सल्लागार यांच्या २०२६ या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व धनगर समाज बांधवांना आमदार निकम यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्था देवरुख संघटनेच्या वतीने आमदार शेखर निकम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.








