रत्नागिरी, दि. ०३ : जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले. नववर्षाच्या प्रारंभी रत्नागिरीकरांसाठी खरेदी, मनोरंजन आणि अनुभवांचा संगम साधणारे हे प्रदर्शन नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
‘गारवा ग्रँड एक्झिबिशन’चे आयोजन ३, ४ आणि ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात आले असून, या तीन दिवसांत विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच आकर्षक खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन, ज्यामध्ये सुप्रसिद्ध ‘सरिताज किचन’च्या सरिता पदमन या प्रशिक्षण देणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आयोजकांचे कौतुक करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे स्थानिक व्यावसायिकांना चालना मिळते तसेच महिलांना स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नगरसेविका सौ. स्मितल पावसकर, सौ. पूजा पवार, सौ. मेधा कुलकर्णी, सौ. श्रद्धा हळदणकर, सौ. सायली पाटील, सौ. जागृती पिळणकर, सौ. प्रीती सुर्वे, सौ. वर्षा ढेकणे, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. निवेदिता कळंबटे, सौ. आदिती देसाई, सौ. आरती पटवर्धन, सौ. तृप्ती लोध यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनात विविध आकर्षक स्टॉल्स, मोठ्या सवलतींसह खरेदीची संधी, खाद्यपदार्थांचा आस्वाद, तसेच लकी ड्रॉसह अनेक मनोरंजक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी आणि नववर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘गारवा ग्रँड एक्झिबिशन २०२६’ ही रत्नागिरीकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.








