चिपळूण, दि. ०९ (वार्ताहर) : खेरशेत गावचे सुपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक व कवी मिलिंद कदम यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय व लोकाभिमुख कार्याची दखल घेत महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त दि. ६ जानेवारी रोजी मुंबई येथे हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून मिलिंद कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दि. १ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाला २५ वर्षे पूर्ण झाली असून संस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधत, संघात भरीव योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मिलिंद कदम हे गुहागर पंचायत समितीत कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून सेवा बजावत असतानाच सामाजिक क्षेत्रातही ते सातत्याने कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी केलेल्या परखड लेखनातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी नेहमीच लक्ष वेधले असून समाजजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक उपक्रमांना मदतीचा हात देत त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या लोकाभिमुख कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनी सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी नगरपाल (महाराष्ट्र शासन) डॉ. जगन्नाथ हेगडे, समाजसेविका जयश्री संगीत राव, संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, सचिव अशोक भोसले, शशिकांत सावंत, मिलिंद कदम यांचे बंधू राजेंद्र कदम व चिरंजीव मिहिर कदम, संतोष पवार, अजित हळदे आदी मान्यवर उपस्थित होते.








