सव्वा कोटींच्या ‘डिजिटल अरेस्ट’ सायबर फसवणुकीप्रकरणी एकास अटक ; रत्नागिरी पोलीस दलाची कारवाई

रत्नागिरी, दि. २७ : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या एका आरोपीस रत्नागिरी पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपीने स्वतःला बेंगळुरू पोलीस तसेच नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांना फोनद्वारे संपर्क साधला. फिर्यादी यांच्या कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची भीती घालून, चौकशीसाठी ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून आरोपीने फिर्यादी यांची एकूण ₹१,२३,००,००० (एक कोटी तेवीस लाख रुपये) इतकी आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर (दापोली पोलीस ठाणे) ०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (२), ३१८ (४), ३१९ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान बँकांकडून प्राप्त झालेली आर्थिक व्यवहारांची माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीचे पथक मुंबई व ठाणे येथे पाठविण्यात आले. स्थानिक माहितीच्या आधारे मुंबई येथून दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, पोलीस हवालदार १०४० संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल ७३९ सौरभ कदम, ७४ रोहन कदम व ३२७ निलेश शेलार यांनी केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी करीत आहे.

दरम्यान, रत्नागिरी पोलीस दलामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही पोलीस, सीबीआय, नॅशनल सिक्युरिटी विभाग किंवा इतर शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फोनद्वारे बँक खाते, सिमकार्ड गैरवापराची भीती घालून वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती मागत असेल अथवा अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नये.

आपली वैयक्तिक तसेच बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नये व अशा सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी वाचा