दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचं विधीवत विसर्जन

दु:ख बाजूला ठेवत शरद पवारांनी नीरा नदीतील प्रदूषणाची केली पाहणी

बारामती (पुणे), दि . ३० : बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचं विधीवत विसर्जन अत्यंत भावनिक वातावरणात पार पडलं.
सकाळपासून सुरू झालेल्या सावडण्याच्या धार्मिक विधींमुळे परिसरात शोकमय वातावरण पसरलं होतं. विधी पूर्ण झाल्यानंतर पवार कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी बारामती तालुक्यातील सोनगावकडे रवाना झाले.
पाच कलश, एक भावनिक निरोप
दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचे एकूण पाच कलश तयार करण्यात आले होते. यापैकी एक कलश सोनगाव येथील कर्हा–नीरा नद्यांच्या पवित्र संगमावर वैदिक पद्धतीने विसर्जित करण्यात आला. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
उर्वरित अस्थी विद्या प्रतिष्ठान परिसरात, बारामती शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या झाडांजवळ तसेच दिवंगत अजित पवार यांच्या शेतात विसर्जित केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. आपल्या कार्याशी आणि भूमीशी असलेली नाळ अखेरपर्यंत जपण्याचा हा निर्णय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अंतिम साश्रू नमन
अस्थी विसर्जनाचा विधी दिवंगत अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र जय पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार राणा जगजीत सिंह पाटील, श्रीनिवास पवार, रणजीत पवार, राजेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं.
नीरा संगमावर पार पडलेला हा क्षण केवळ धार्मिक विधी नसून, जनतेशी कुटुंबवत नातं जपणाऱ्या नेतृत्वाला दिलेलं अंतिम साश्रू नमन ठरलं.
दुःखावर मात करत शरद पवार जनहितासाठी मैदानात
अजित पवार यांच्या अकाली निधना
चा आघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर अत्यंत मोठा आहे. तरीही या अपार दुःखातून सावरत त्यांनी जनहिताची जबाबदारी ओळखून थेट बारामती तालुक्यातील नीरा नदीची पाहणी केली.
नीरा नदीतील वाढत्या जलप्रदूषणामुळे शेती, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
जनतेतून कौतुक
या पाहणीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते हेही शरद पवार यांच्यासोबत होते.
स्वतःच्या दुःखावर मात करत जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहणाऱ्या शरद पवारांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आणखी वाचा