रत्नागिरी, प्रतिनिधी : जयगड येथील JSW पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा तब्बल ४५ मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १३ जून) घडली. या घटनेमुळे पोर्ट परिसरातील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मृत कामगाराचे नाव राजुकुमार बालेश्वर सिंह (रा. सेमरा, अनुग्रह नगर, सिवान, बिहार) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बी-५ कोल शेडवर उंचावर लोखंडी पर्लिंगचे काम करत होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम संपल्यानंतर ते सहकाऱ्यांसोबत खाली उतरत असताना हा अपघात घडला.
राजुकुमार यांनी सुरक्षा हुकचा वापर केला होता. मात्र पुढे सरकताना हुक बदलण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो व्यवस्थित अडकला नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी त्यांचा पाय फायबरच्या पत्र्यावर पडला. वजनाचा ताण सहन न झाल्याने पत्रा तुटला आणि ते सुमारे ४५ मीटर उंचीवरून थेट खाली कोसळले.
या भीषण अपघातात त्यांच्या हात, पाय आणि पोटाला गंभीर दुखापती झाल्या. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा सुरू झाली आहे. उंचीवर काम करताना डबल लॅन्यार्ड सेफ्टी हार्नेस, लाईफ लाईन, सेफ्टी नेट आणि अन्य सुरक्षा साधनांचा वापर झाला होता का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच घटनास्थळी सुरक्षा पर्यवेक्षकांची उपस्थिती आणि सुरक्षा नियमांचे पालन याबाबतही चौकशीची मागणी होत आहे.
कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही हलगर्जी झाली होती का, याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. या दुर्घटनेमुळे औद्योगिक प्रकल्पांमधील सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.








