मोसमी पावसाची वाटचाल मंदावली; राज्यात उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने उष्णता आणि दमट वातावरणाचा प्रभाव वाढला असून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना प्रखर उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, मोसमी पावसाची राज्यातील उत्तरेकडील सीमा गेल्या चार दिवसांपासून स्थिर असल्याने पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

तळकोकणात ६ जून रोजी मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर राज्यभर पावसाचा वेगाने विस्तार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मोसमी वाऱ्यांची गती कमी झाल्यामुळे पावसाची पुढील वाटचाल संथ झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, वायव्य दिशेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव, मोसमी वारे सक्रिय होण्यासाठी आवश्यक असलेल्या हवामान प्रणालींचा अभाव आणि पुरेशा प्रमाणात ढगांची निर्मिती न होणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

सध्या राज्यातील बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण असून काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही चिंतेत आहे. पावसाअभावी खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. मात्र राज्यात मोसमी पावसाची व्यापक आणि समाधानकारक प्रगती तातडीने होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काही भागांत स्थानिक वातावरणामुळे मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता कायम असली तरी उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष आता मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.

आणखी वाचा