पंढरपूर, दि. १४ : शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस होता. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून राज्यभरातून शेतकरी, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे.
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करत रोहित पवार आंदोलनावर ठाम आहेत. “सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. जाचक अटी हटवल्याशिवाय माघार घेणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची प्रकृती खालावू लागली आहे. सलग दोन दिवस त्यांनी पाणीही घेतले नव्हते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पाणी घेतले असले तरी ओआरएस घेण्यास नकार दिला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे निदर्शनास आले. सलाईन लावण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी रोहित पवार यांनी अद्याप त्यास संमती दिलेली नाही.
प्रकृतीची माहिती मिळताच त्यांच्या आई, पत्नी, बहीण आणि दोन्ही मुलांनी आंदोलनस्थळी भेट दिली. कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे वातावरण भावनिक झाले. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. “मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं आहे. तो स्वतःच्या नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतोय. शेतकरी जागा झाला तरच सरकारला जाग येईल,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे शेतकरी नेते राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काँग्रेसचे नेते सुनील केदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते आंदोलनस्थळी दाखल झाले.
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. विविध जिल्ह्यांतून शेतकरी संघटना आणि कार्यकर्ते पंढरपूरकडे दाखल होत आहेत.
दुसरीकडे, सरकारकडूनही या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सातत्याने संपर्कात आहेत. तसेच फडणवीस सरकारमधील संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या भेटीनंतर आंदोलनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चेतून मार्ग निघणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








