बाळ माने यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह; ‘पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही’ – रवींद्र चव्हाण

रत्नागिरी, दि. १७ : ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चेत असलेल्या माजी आमदार बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा धक्का दिला आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना चव्हाण म्हणाले, “जे लोक संधी साधून महाविकास आघाडीकडे गेले, त्यांना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.” त्यांच्या या विधानामुळे बाळ माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेली उमेदवारी बाळ माने यांनी मागे घेतल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी बाळ माने हे भाजपचे जुने सहकारी असल्याचे सांगत सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

यावेळी चव्हाण यांनी कोकणातील बेरोजगारीच्या प्रश्नावरही भाष्य केले. कोकणात धार्मिक पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आवाहन करत मार्लेश्वर, गणपतीपुळे, संगमेश्वर सूर्यमंदिर, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि धूतपापेश्वर मंदिर यांसारख्या स्थळांचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

तसेच भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात किमान पाच निष्ठावंत कार्यकर्ते तयार करण्याचे आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

या मेळाव्यास विधान परिषद आमदार प्रमोद जठार, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, खासदार धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा