खेडमध्ये १० किलोहून अधिक अंबरग्रीस जप्त; दोघांना अटक, कस्टम विभागाची मोठी कारवाई

खेड, दि. १७ : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत तब्बल १० किलोहून अधिक अंबरग्रीस (व्हेलची उलटी) जप्त केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे उल्लंघन करून काहीजण अंबरग्रीसची अवैध वाहतूक आणि विक्री करत असल्याची गुप्त माहिती दापोली सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार १५ आणि १६ जूनच्या मध्यरात्रीनंतर अधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून एक रेनॉल्ट क्विड कार अडवली.
तपासणीदरम्यान वाहनातून १० किलोहून अधिक अंबरग्रीस आढळून आले. अंबरग्रीस हा स्पर्म व्हेलपासून निर्माण होणारा अत्यंत मौल्यवान पदार्थ असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असते. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याची खरेदी-विक्री आणि वाहतूक प्रतिबंधित आहे.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची-१ मधील संरक्षित प्रजातींशी संबंधित असल्याने जप्त केलेला माल ताब्यात घेण्यात आला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून जप्त मालाचा ताबा वन विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक (प्रतिबंधक व गुप्तचर) अतुल पोतदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात कविता नायर, रविकांत, प्रतिक अहलावत, धीरज ओझा, नितेश शर्मा, सुहास विलणकर, करण मेहता, गौरव मौर्य, प्रशांत खोब्रागडे, अमित पालशेतकर आणि किरण सागावकर यांचा समावेश होता.

दरम्यान, सीमाशुल्क विभागाने नागरिकांना तस्करीसंदर्भातील माहिती देण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ८४२११८८७५० या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे माहिती देता येणार आहे.

आणखी वाचा