गोहत्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांची पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक

गोतस्करी आणि गोहत्या रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन करणार; पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची ग्वाही

रत्नागिरी, दि. २५ : रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथे उघडकीस आलेल्या गोवंश कत्तल प्रकरणाच्या निषेधार्थ समस्त हिंदुत्ववादी संघटना, गोरक्षक आणि गोप्रेमींनी गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

फणसवळे येथील तांबड्याचा पऱ्या परिसरात सुमारे चार गोवंश जनावरांची निर्घृण कत्तल झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी आंदोलकांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या गोतस्करी आणि गोहत्यांवर पोलिस प्रशासनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप केला. गोवंशाला राज्यात ‘राज्यमाता’चा दर्जा देण्यात आला असतानाही अशा घटना घडत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पोलिस अधीक्षक बगाटे यांनी या प्रकरणाकडे स्वतः लक्ष दिले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगितले. तसेच गोतस्करी आणि गोहत्या रोखण्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

संघटनांनी सादर केलेल्या निवेदनात फणसवळे येथील घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना तात्काळ अटक करणे, जलदगती न्यायालयात खटला चालवणे, अवैध पशुवाहतुकीवर नियंत्रणासाठी विशेष पथके नेमणे, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे अशा मागण्या करण्यात आल्या.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना लवकर अटक न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.

या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, विश्वमंगल गोशाळा, गोसेवा संघ, भाजप, मनसे यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, गोरक्षक आणि गोसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आणखी वाचा