मुंबई, दि. ०१ : मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि कोकणात बुधवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. अनेक सखल भाग जलमय झाले, रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक संथ झाली, तर रेल्वे सेवेलाही मोठा फटका बसला. भारतीय हवामान विभागाने पालघरसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी २ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईत पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, वरळी आणि चेंबूर परिसरात रस्ते जलमय झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
हार्बर मार्गावरील ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरमध्ये बिघाड झाल्याने लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. अनेक गाड्या उशिराने धावल्या, तर काही गाड्या मध्येच थांबल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. मुसळधार पावसाचा परिणाम मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवांवरही झाला.
दरम्यान, दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ रोडवरील ‘सूर्यप्रकाश’ या जुन्या म्हाडा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग कोसळून संतोष रामचंद्र भरासकर (५१) यांचा मृत्यू झाला. घाटकोपरमध्ये धावत्या टेम्पोवर झाडाची मोठी फांदी कोसळली, तर जोगेश्वरी आणि मरोल परिसरातही झाडे पडल्याने वाहनांचे नुकसान झाले.
वसईतील वाघराळ पाड्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोन कार आणि तीन दुचाकी वाहून गेल्या. सुदैवाने एका कारचालकाने वेळेत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. ठाण्यात गेल्या काही तासांत ८० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, अनेक सखल भागांत पाणी साचले. नवी मुंबईतील सानपाडा आणि सायन-पनवेल महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरही काही ठिकाणी पाणी आल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस कोकण, मुंबई महानगर प्रदेश, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.








