लोटे एमआयडीसीतील कथित विषारी राखेमुळे पर्यावरणाचा प्रश्न; चौकशीची मागणी

खेड, दि. ०३ : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीने कथितपणे रासायनिकयुक्त विषारी राख मोकळ्या जागेत टाकल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे परिसरातील मोकाट जनावरे, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी आक्रमक भूमिका घेत तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आखाडे यांनी सांगितले की, संबंधित कंपनीने रासायनिकयुक्त राख एमआयडीसीतील कंपनीलगतच्या खुल्या जागेत टाकली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ही राख पावसाच्या पाण्यात मिसळून परिसरात वाहत आहे. त्यामुळे त्या भागात फिरणाऱ्या गायी, गुरे व इतर मोकाट प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या रसायनयुक्त पाण्याचा पर्यावरणावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

याच परिसरात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. पावसाचे पाणी विषारी राखेसह जलस्रोतांमध्ये मिसळल्यास स्थानिक नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा आखाडे यांनी केला.

या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित कंपनीला अशा प्रकारे विषारी राख उघड्यावर टाकण्याची अधिकृत परवानगी आहे का, प्रशासन आणि कंपनीमध्ये काही साटेलोटे आहे का, तसेच या प्रकारामुळे जनावरे किंवा नागरिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

आखाडे यांनी संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून राखेचे नमुने तपासावेत, पर्यावरणीय परिणामांचा अहवाल जाहीर करावा आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील विषारी राखेबाबतचे आरोप संबंधित पक्षांकडून करण्यात आले असून, या संदर्भात संबंधित कंपनी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. आरोपांची शासकीय यंत्रणेकडून पडताळणी होणे बाकी आहे.

आणखी वाचा