रत्नागिरी, दि. ३ : कोकणात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून रत्नागिरीसह संपूर्ण कोकणासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पाऊस, समुद्रातील उंच लाटा आणि नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासन सतर्क झाले असून विविध ठिकाणी खबरदारीचे उपाय राबविण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 619.77 मिमी एकूण पर्जन्यमान, तर 68.86 मिमी सरासरी पाऊस नोंदवण्यात आला. मंडणगडमध्ये सर्वाधिक 143.50 मिमी पाऊस झाला, तर गुहागरमध्ये 40.80 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रात ताशी सुमारे 40 किमी वेगाने वारे वाहत असल्याने रत्नागिरीसह किनारपट्टीवरील बंदरांवर क्रमांक 3 चा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जगबुडी नदी इशारा पातळीवर, एनडीआरएफ सज्ज
सततच्या पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व आपत्कालीन पथके, बोटी आणि बचाव साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. चिपळूणमध्ये एनडीआरएफचे 29 सदस्यांचे पथक तैनात असून त्यांनी पूरप्रवण भागांची पाहणी केली आहे.
शीळ धरण तुडुंब; पाणीटंचाईचा प्रश्न मिटला
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच दापोलीतील सुकवंडी आणि पंचनंदी धरणे 100 टक्के भरली असून जिल्ह्यातील 20 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
आंबेनळी घाट ७ जुलैपर्यंत बंद
अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट 3 ते 7 जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला असून वाहनचालकांना ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर-चिपळूण-कराड मार्गाचा पर्याय वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील परिस्थिती
महावेधच्या आकडेवारीनुसार रायगडमध्ये सर्वाधिक 121.40 मिमी तर सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी 37.90 मिमी पाऊस झाला. रोहा येथील अंबा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. कोकणात आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांत चार जणांचा मृत्यू, 83 घरांचे नुकसान आणि रत्नागिरी जिल्ह्यात 18 पाळीव जनावरे दगावल्याची नोंद आहे. मात्र, कोणत्याही धरणातून विसर्ग सुरू नसून रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.








